मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेला मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधी उघड पाठिंबा देत आहेत. बीड येथे झालेल्या इशारा बैठकीत त्यांनी समाजाला लोकप्रतिनिधींना घरी बसू देऊ नका, असे आवाहन केले होते. त्यानंतर आता आमदार, खासदारांसह विविध नेत्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे जाहीर केले आहे.
बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके हे सुरुवातीपासूनच जरांगेंच्या पाठीशी आहेत. मुंबई आंदोलनाच्या घोषणेनंतर त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे ठरवले आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी “चलो मुंबई” हाक देत आंदोलनात जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंच्या पाठिंब्यामुळेच आपण खासदार झालो असल्याची कबुली देत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सोशल मीडियावरून तसेच पोस्टर्सद्वारे जनतेला आंदोलनासाठी आवाहन केले आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवरून सरकारला आरक्षणावर तोडगा काढण्याची मागणी केली असून आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शवला आहे. धाराशिव-कळंबचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनीसुद्धा आंदोलनासाठी जनतेला आवाहन केले आहे.
परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी व्हिडिओद्वारे सरकारवर हल्लाबोल करत आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारवर दबाव वाढवण्याच्या हेतूने जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या मुंबई आंदोलनाला लोकप्रतिनिधींचा वाढता पाठिंबा ही आगामी घडामोडींची दिशा ठरवणारी बाब ठरणार आहे.
मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल
दरम्यान, मनोज जरांगे आता शिवनेरीवर दाखल झाले आहेत. शिवनेरीच्या पायथ्याशी मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. मनोज जरांगे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये पहाटे पोहोचले. थोड्याच वेळात ते शिवनेरी गडावरती पोहोचणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणी दर्शन घेऊन ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.