Breaking
Updated: मे 14, 2026
तहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टॅंकरचे उद्घाटन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेला गॅसचा तुटवडा लक्षात घेता, शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेला रॉकेलचा (घासलेट) पुरवठा बीड जिल्ह्यात आता नव्याने पुन्हा सुरू झाला असून, अंबाजोगाईत केरोसीनचा पहिला टँकर दाखल झाला आहे.
तहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते रॉकेलचे बीड जिल्ह्याचे मुख्य वितरक चंद्रशेखर वाघमारे यांच्या व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या टँकरचे आज (दि.१४ फेब्रुवारी ) विधिवत उद्घाटन करण्यात आले.
अन्न नागरी पुरवठा विभाग आणि जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली १५ हजार लिटरचा हा पहिला टँकर अंबाजोगाईत आला आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात मार्फत शासनाच्या निर्देशानुसार या रॉकेलचे वितरण हळूहळू सुरु होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर अंबाजोगाई तालुक्यातील एकूण ४५ हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून, प्रत्येक लाभधारकाला ३ लिटर केरोसीन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, हे केरोसीन ६२ रुपये प्रति लिटर या दराने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विलास तरंगे यांनी दिली.
गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचे वातावरण असल्याने गॅसच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही परिस्थिती सुरळीतपणे हाताळण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा रॉकेल वितरणाचे धोरण अवलंबले आहे. नागरिकांनी या सुविधेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तहसील कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या टँकरच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रशेखर वडमारे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, अॅड. सुनील पन्हाळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बाहेती, प्रा. पंडित कराड, शहरातील रॉकेल विक्रेते यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.