Breaking

कोरडेवाडीच्या माजी सरपंचा विरुद्ध पात्रतेचे अपील अर्ज नामंजूर

Updated: मार्च 10, 2026

By Vivek Sindhu

जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय 

केज :- केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील तत्कालीन सरपंच नंदूबाई रमेश कोरडे यांनी त्यांच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून भोगवट्यात त्यांच्या पतीच्या नावाची नोंद केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना अपात्र करण्यात यावे. हे अपील जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केले आहे.

कोरडेवाडी ता. केज येथील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच नंदूबाई रमेश कोरडे यांनी त्यांच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करीत ग्रामपंचायतीच्या मालमत्ता क्र. ३०२ या सार्वजनिक वापराच्या शासकीय खुल्या जागेवर अतिक्रमण करून त्यांचे पती रमेश देवराव कोरडे यांचे नाव भोगवट्यां मध्ये अभिलेखात नोंद केले आहे. म्हणून त्यांचे सदस्यत्व व पद रद्द करण्यात यावे. म्हणून ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सदस्या महानंदा दत्ता गित्ते यांनी त्यांच्या विरुद्ध मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपील अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशाने विस्तार अधिकाऱ्यां मार्फत चौकशी केली. विस्तार अधिकारी बी. टी. राठोड यांच्या चौकशी अहवाला नुसार सदरील जागेच्या मालकी हक्कामध्ये व्हाईटनर लावलेल्या जागेच्या खाली भगवान माळी यांचे नाव दिसून येत असून त्यावर सरकार असे लिहिले आहे. तर भोगवट्यात रमेश कोरडे हे नाव दिसून येत आहे. रमेश कोरडे यांच्या नावाची नोंद कशाच्या आधारे घेण्यात आली? त्याचा उल्लेख कुठेही नाही. तर ग्रामपंचायत स्तरावर अतिक्रमण नोंदवही नसल्याने, अतिक्रमण आहे किंवा नाही, याचा बोध होत नाही. तसेच ग्रामसेवकांचे लेखी म्हणणे घेण्यात आले. 

या प्रकरणी २६ सप्टेंबर २०२३ ते २७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान नऊ वेळा सुनावणी घेण्यात आली. 

तत्कालीन सरपंच नंदूबाई कोरडे यांनी अतिक्रमण केल्याचा ठोस पुराव्याद्वारे सिद्ध झाले नाही. तर सदर अपील अर्जातील सर्व कागदपत्रे, अहवाल, अर्जदार व गैरअर्जदार यांचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे, पुरावे व अपीलातील नमूद मुद्यांचा विचार करता अर्जदार यांचे अपील अर्ज विधीग्राह्य नसल्याने त्यांचा अपील अर्ज नामंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला आहे. तर गटविकास अधिकाऱ्यांना सदर मालमत्तेच्या पी.टी.आर./ नमुना ८-अ मधील खाडाखोड आणि विवादग्रस्त नोंदी लक्षात घेता. सदर मालमत्ते बाबत शासनाच्या प्रचलित नियमां नुसार सरकारी नोंद अशी आवश्यक ती कार्यवाही आदेशाच्या दिनांका पासून पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करावी. 

सदर कार्यवाही पूर्ण केल्या नंतर, करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अनुपालन अहवाल संबंधित कागदपत्रांसह या कार्यालयास तात्काळ सादर करावा. सदर संचिका नस्तीबंद करून अभिलेख कक्षात जतन करण्या करिता ठेवण्यात यावी. असे आदेश ही दिले आहेत.

सरपंच नंदुबाई कोरडे या यांच्या वतीने ॲड. ए. एच. आरडे यांनी त्यांची बाजू मांडली.


Categories

Recent Posts