Breaking

बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा छापा; १.६० लाखांचा अवैध गुटखा जप्त

Updated: मार्च 9, 2026

By Vivek Sindhu

१.६० लाखांचा अवैध गुटखा जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने बशीरगंज भागात एका पत्र्याच्या शेडवर धाड टाकून १ लाख ६० हजार २४० रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सोमवारी, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी शेख इरफान जब्बार याला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार सलमान रफिक बागवान हा फरार झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, बशीरगंज येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये विविध कंपन्यांचा गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला असता, पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये साठवलेला मोठ्या प्रमाणावर गुटखा मिळून आला. आरोपी शेख इरफान जब्बार हा फरार आरोपी सलमान बागवान याच्या सांगण्यावरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा साठा करून विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या यशस्वी कामगिरीत पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्यासह गोविंद राख, युनुस बागवान, अंकुश वरपे, स्वाती मुंडे, अशपाक सय्यद, मनोज परजणे, बबन सलगर आणि नितीन वडमारे यांचा सहभाग होता. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts