Breaking
Updated: फेब्रुवारी 25, 2026
पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्याने पतीचा पोलीस चौकीच्या आवारातच आत्महत्येचा प्रयत्न
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी तालुक्यातील कडा पोलीस चौकीच्या परिसरात मंगळवारी दुपारी एका तरुणाने आपल्या पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील राहुल छबू वाल्हेकर असे या तरुणाचे नाव असून, कौटुंबिक वादातून उद्भवलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, राहुल वाल्हेकर हा आपल्या पत्नीला आणि मुलांना सातत्याने मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मुलांसह कडा येथे मजुरी करणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे राहण्यास आली होती. मंगळवारी राहुल आपल्या पत्नीला पुन्हा घरी नेण्यासाठी कडा येथे पोहोचला होता. मात्र, वारंवार होणाऱ्या छळामुळे पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये कडा पोलीस चौकीच्या परिसरात जोरदार वादावादी झाली. पत्नी आपल्यासोबत येण्यास तयार नसल्याचे पाहून संतापलेल्या राहुलने जवळच असलेल्या एका विद्युत रोहित्रापाशी जाऊन विषारी औषध प्राशन केले.
हा गंभीर प्रकार कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखले. पोलीस हवालदार नंदकिशोर सवासे, भाऊसाहेब आहेर, गणेश भुतेकर आणि चंद्रमुनी बनसोडे यांनी तातडीने राहुलच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी विलंब न करता रुग्णवाहिका बोलावून त्याला कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर राहुलची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे राहुलचे प्राण वाचण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.