Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत गॅरेज चालकाचा प्रामाणिकपणा: ८० हजारांची रोकड व दागिन्यांची पर्स मालकास परत

Updated: फेब्रुवारी 17, 2026

By Vivek Sindhu

८० हजारांची रोकड व दागिन्यांची पर्स मालकास परत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

​अंबाजोगाई: आजच्या काळात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीचे एक आगळेवेगळे उदाहरण समोर आले आहे. चनई परिसरात हरवलेली सुमारे ७५ ते ८० हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने असलेली मौल्यवान पर्स एका गॅरेज चालकाने प्रामाणिकपणे पोलिसांच्या हवाली केली. खलील रफिक शेख असे या तरुणाचे नाव असून त्यांच्या या निस्वार्थी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, डोंगर पिंपळा येथील रहिवासी राधा ऋषिकेश पवार या मंगळवारी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी आपल्या कुटुंबासह चनई परिसरातून जात होत्या. किरमानी नगर दर्गा परिसरात साडेचार वाजेच्या सुमारास लहान मुलाला रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी बसवले असता, घाईघाईत त्या आपली पर्स तिथेच विसरून निघून गेल्या. या पर्समध्ये ८० हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम, सोन्याचे मौल्यवान दागिने आणि एक मोबाईल फोन होता. साधारण तासाभरानंतर त्यांना पर्स हरवल्याचे लक्षात आले, तोवर पवार कुटुंब अत्यंत चिंतेत होते.

​दरम्यान, क्रांतीनगर येथील रहिवासी आणि पेशाने गॅरेज चालक असलेले खलील रफिक शेख हे त्याच मार्गावरून जात असताना त्यांना ही बेवारस पर्स दिसून आली. पर्स उघडून पाहिली असता त्यात मोठी रोकड आणि दागिने असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, कोणत्याही आर्थिक फायद्याचा मोह न धरता त्यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ते स्वतः अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी ती पर्स पोलिसांकडे जमा केली.

​पोलिसांनी पर्समधील मोबाईलवर आलेल्या दूरध्वनीवरून अधिक चौकशी केली असता, ही पर्स राधा पवार यांची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पवार कुटुंबाला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन योग्य ती खातरजमा केली आणि सर्व मुद्देमाल पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांच्या स्वाधीन केला. आपली हरवलेली पुंजी आणि दागिने सुरक्षित परत मिळाल्याने पवार कुटुंब भावूक झाले आणि त्यांनी खलील शेख यांचे आभार मानले.

​खलील शेख यांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेबद्दल अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. एका कष्टकरी गॅरेज चालकाने दाखवलेली ही इमानदारी समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. पोलिसांनी या निमित्ताने नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आणि अशा प्रकारे कोणतीही हरवलेली वस्तू मिळाल्यास ती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


Categories

Recent Posts