युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
अपहरण झालेल्या मुलीचा दीड महिन्यापासून तपास लागेना
केज - इयत्ता १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी महाविद्यालयात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचे तिच्या मामाच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केल्याची दीड महिन्यांपूर्वी घडली होती. मुलीचा तपास लावण्यास पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याने मुलीच्या आईने युसुफवडगाव (ता. केज) पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धरल्यामुळे अनर्थ टळला.
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील योगेश्वरी व्यंकट माने या महिलेची मुलगी ऋतुजा व्यंकट माने ही आपेगाव येथील किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ५ फेब्रुवारी रोजी ऋतुजा माने ही आपल्या मामाच्या मुलीसोबत बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आपेगाव येथील किसान विद्यालयात गेली होती. यावेळी तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ हरीभाऊ काळे (रा. भावठाना ता. अंबाजोगाई) व त्याची आई मिरा हरीभाऊ काळे या दोघांनी मायलेकांनी तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून फुस लावून ऋतुजा माने हिस पळवून नेले. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार मुलीची आई ज्ञानेश्वरी माने यांनी दिल्यावरून गोपाळ काळे, मीरा काळे या दोघा मायलेकाविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ काळे आणि मिरा काळे या दोघा मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बसवेश्वर चेन्नशेट्टी हे करीत होते.
या घटनेला दीड महिन्याचा कालावधी लोटला, तरी मुलीचा तपास लावण्यास पोलिसांकडून दिरंगाई होत असल्यावरून मुलीची आई योगेश्वरी माने या गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोलचे कॅंड घेऊन आल्या. मुलीचा तपास का लावला जात नाही ? असे म्हणत त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महदहन करण्याचा प्रयत्न केला. या महिलेचा आरडाओरडा ऐकून जमा झालेल्या पोलिसांनी त्यांना धरून आत्मदहन करू दिले नाही. यावेळी फौजदार राहुल पतंगे, फौजदार बसवेश्वर चेन्नशेट्टी यांनी तिची समजूत काढली.
