दारू पिण्यासाठी पैसे का देत नाहीस या कारणावरून जातीवाचक शिविगाळ करून केली मारहाण
अंबाजोगाई - आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे दे तुझ्या समाजाचे गावात एकमेव घर आहे. तु जर आम्हाला पैसे नाहीस दिले तर तुझे घर गावातून उठवू असे म्हणत युवकास मारहाण करून जातीवाचक शिव्या दिल्या व या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी दस्तगीरवाडी येथील तिघा जणाविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
दस्तगीरवाडी येथील फिर्यादी जालिंदर भगवान साळे, व्यवसाय मजुरी जात होलेर याचा मुलगा बालाजी साळे हा दि.8 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथे असताना दुपारच्या सुमारास गावातील माऊली विनायक माने, कुणाल रामचंद्र घाडगे, शुभम भारत घाडगे यांनी बालाजी यास अंबाजोगाई शहरातील हत्तीखाना परिसरात नेले. आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे का देत नाहीस या कारणावरून बेदम मारहाण केली. तसेच गावात तुझे घर एकच आहे. ते आम्ही उठवू असे म्हणून जातीवाचक शिविगाळ केली व खिशातील दहा हजार किंमतीचा मोबाईल काढून घेतला. या प्रकरणी युवकाचे वडील जालिंदर भगवान साळे यांच्या फिर्यादीवरून माऊली माने, कुणाल घाडगे व शुभम घाडगे यांच्याविरूद्ध मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी अंबाजेागाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
