Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

तळेगाव शिवारात विहीरीतील जिलेटीन स्फोटात कामगाराचा मृत्यू

तिघे गभीर जखमी; पैकी दोघे चिंताजनक

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील तळेगाव घाट शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये वैयक्तिक जलसिंचन विहिरीचे काम सुरू असताना ब्लास्टिंग करताना जिलेटीनचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एकावर स्वा.रा.ती. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवार सकाळी ११.३० वाजता घडली.

तालुक्यातील तळेगाव घाट तांडा शिवारातील उत्तम पांडुरंग आडे यांना शासनाच्या वैयक्तिक जलसिंचन विहिरीसाठी मंजुरी मिळाली होती. या विहिरीचे काम सुरू असताना मंगळवारी जिलेटीनचा स्फोट करण्यात आला होता. उर्वरित काम सुरू असताना बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास अचानक जिलेटीनचा स्फोट झाला. या स्फोटात धनराज अनंत दहीफळे (रा. खोडवा सावरगाव, ता. परळी) हे ५० फूट खोल विहिरीतून हवेत १० फूट उंच उडून परत विहिरीत पडले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याच स्फोटात पिंटू विठ्ठल दहीफळे आणि जीवन हरिश्चंद्र दहीफळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने स्वा.रा.ती. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच भारत तुकाराम पवार (रा. तळेगाव) हा देखील जखमी असून, त्याच्यावर स्वा.रा.ती. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अतिरिक्त पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळी केली पाहणी

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक चेतना तिडके, पोलिस उपअधिक्षक चोरमले, बर्दापूर पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. राजकुमार ससाने, बिट अंमलदार चेवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले.

उत्तम आडे यांच्या वैयक्तिक विहिरीच्या खोदकामासाठी खोडवा सावरगाव येथील हरिश्चंद्र दहीफळे व गोविंद दहीफळे यांच्या ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरला काम देण्यात आले होते. हे काम सुरू असतानाच हा दुर्दैवी अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या स्फोटामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Wednesday 19th of March 2025 09:35 PM

Advertisement

Advertisement