उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीतून संतोष देशमुखांच्या घराची उभारणीस सुरुवात
नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन
केज - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उघड्यावर पडलेल्या देशमुख कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकत्व स्वीकारले आहे. त्यांच्या मदतीतून देशमुख यांच्या घराची उभारणी होणार असून मंगळवारी श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करून बांधकामास सुरुवात झाली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. देशमुख यांचे घर हे पूर्वजांनी १९८० साली बांधलेले आहे. पडझड झालेल्या घरात देशमुख कुटुंब वास्तव्य करीत होते. घरची परिस्थिती बिकट असताना देखील संतोष देशमुखांनी समाजासाठी काम केले आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. घरातील करता माणूस गेला पण त्याच्या मागे संसार उघडा पडला होता. शासकीय मदत मिळेल ती मिळेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मंगळवारी देशमुखांच्या घराचे काम सुरू झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून हे घर उभारले जात आहे. मंगळवारी घेतलेल्या बोअरला पाणीही लागले आहे. तर नारायणगडचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन करीत बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. घर उभं करण्यासाठी जी काही मदत लागणार आहे, ती मदत उपमुख्यमंत्री शिंदे हे देणार आहे. यावेळी धनंजय देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्निल गलधर, यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे संवेदनशील व्यक्ती म्हणून पाहिले जाते. राज्याचे मुख्यमंत्री असताना शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत. अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिंदे हे तत्परतेने धावून जातात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
