Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

रेल्वेनंतर आता बीडला विमानतळाची भेट; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधिमंडळात घोषणा

बीड - विविध गुन्हेगारी घटनांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये भव्य विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांना रेल्वेसह आता हक्काचे विमानतळही मिळणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज (17) मार्च 2025) रोजी विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली. सततचा दुष्काळ आणि गुन्हेगारी घटनांमुळे मागे पडलेल्या बीड जिल्ह्यासाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय ठरणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक दशकांपासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांसाठी रेल्वेसह विमानतळाचेही स्वप्न सत्यात उतरणार आहे.

विमानतळाच्या मागणीची तेव्हा विरोधकांकडून खिल्ली, आता स्वागत : खा. बजरंग सोनवणे

दि.३० जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यासाठी विमानतळ करावे, असा ठराव मांडला होता. यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला होता. मात्र, विरोधकांनी सोशल मिडीयावर या मागणीची खिल्ली उडविली होती. दरम्यान, दि.१७ मार्च रोजी विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड विमानतळ उभारण्याचा निर्णय जाहिर केला. यानंतर मात्र विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे.

पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत मांजरसुंबा येथे विमानतळाची जागा निश्चित करून त्यासाठी राज्यशासनाकडून मदत मिळावी, असा ठराव खा.बजरंग सोनवणे यांनी मांडला होता. पालकमंत्री अजित पवार यांनी या विषयाला सकारात्मक प्रतिसाद देत, हा विषय मार्गी लावू, असे आश्वासनही दिले होते. दरम्यान, बीडला विमानतळाच्या मागणीची काही लोकांकडून खिल्ली उडविण्यात आली होती. इथे अजून रेल्वेच नाही तर विमानतळाची मागणी अशा पध्दतीने काही मंडळी व्यक्त झाली होती. खा. बजरंग सोनवणे यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाकडून विमानतळाचा प्रस्ताव राज्यशासनाला सादर करण्यात आला. मात्र, यानंतर दि.१७ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात विमानतळ उभारून विकासाला गती देण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाकडून विमानतळाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. याचा विचार करून बीड जिल्ह्यात किमान तीन किलोमिटरची धावपट्टी करून त्याठिकाणी सुसज्ज विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. यानंतर काही मंडळींनी पत्रक घेवून विमानतळाबाबतचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बीडला विमानतळ झाल्यास केवळ बीडचे नव्हे तर मराठवाड्यातील नागरिकांसाठी ही मोठी उपलब्धी असणार आहे. येथील व्यावसायिक प्रगतीला चालना मिळेल आणि दुरचा प्रवासही सुखकर होणार आहे.

Monday 17th of March 2025 08:14 PM

Advertisement

Advertisement