रिझर्व्ह बँकेकडून अंबाजोगाई पिपल्स बँकेस तीन नवीन शाखांना परवानगी
निलंगा, मुरुड आणि केज येथे लवकरच नव्या शाखांचे उदघाटन
अंबाजोगाई : येथील अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेस रिझर्व्ह बँकेने निलंगा, मुरुड आणि केज येथे नवीन तीन शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र बँकेस प्राप्त झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी दिली.
१९९६ साली अल्प भांडवलावर सुरू झालेली बँक आज ५३७ कोटींच्या ठेवी आणि १९ कोटी रुपयांच्या भांडवलावर २० शाखांमार्फत ग्राहकांना सेवा देत आहे. बँकेचा एनपीए शून्य टक्के असून, दरवर्षी ‘अ’ दर्जाचा लेखा परीक्षण अहवाल मिळवत आहे.
बँकेने अलीकडेच अंबाजोगाई (चौसाळकर कॉलनी) आणि छत्रपती संभाजीनगर (सातारा परिसर) येथे शाखा सुरू केल्या आहेत. लवकरच पुणे (पिंपरी-चिंचवड) आणि मुंबई येथेही शाखा सुरू करण्याचा मानस आहे.
डिजिटल बँकिंग क्षेत्रातही बँकेने मोठी प्रगती केली असून, UPI, IMPS, RTGS आणि ATM सुविधांद्वारे ग्राहकांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आर्थिक स्थैर्यासोबतच समाजोपयोगी उपक्रमांवर भर देणारी बँक म्हणून अंबाजोगाई पिपल्स बँक ओळखली जाते.
