Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अजित पवारांच्या नावाने धनंजय मुंडेंकडेच बीडचे पालकत्व:तृप्ती देसाई यांचा आरोप

वाल्मीक कराडला पाठिशी घालणाऱ्यांचे पुरावे SP ला दिले

बीड - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने धनंजय मुंडे हेच बीडचे पालकत्व सांभाळत असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे. बीडमध्ये दररोज एकाहून एक भयंकर घटना उजेडात येत आहेत. पण अजित पवार कुठेच दिसत नाहीत. ते त्यावर काही बोलतही नाहीत. त्यामुळे अजित पवार पालकमंत्रिपद चालवत आहेत की, त्यांच्या नावाने धनंजय मुंडे हेच कारभार पाहत आहेत हे कळत नाही, असे त्या म्हणाल्यात.

तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडशी हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर बीड पोलिस दलात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या निर्देशांनुसार, पोलिसांनी तृप्ती देसाई यांना आपल्या आरोपाचे पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार तृप्ती देसाई यांनी सोमवारी बीड दौऱ्यावर जाऊन पोलिसांना आपल्या आरोपांची पुष्टी करणाऱ्या पुराव्यांचा पेनड्राईव्ह सुपूर्द केला.

26 पोलिसांविरोधात पेनड्राईव्हद्वारे पुरावे दिले

यासंबंधीच्या माहितीनुसार, तृप्ती देसाई सोमवारी सकाळी 11.30 वा. बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या. त्यानंतर बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी 26 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधातील पुरावे पोलिसाना दिलेत. त्यांनी माझा जबाबही घेतला. मी माझे सर्व पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून दिलेत. आता पोलिसांनी चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जिल्ह्याबाहेर पाठवावे. यापैकी अनेक पोलिस कर्मचारी गत अनेक वर्षांपासून एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

धनंजय मुंडेच पालकमंत्रिपद सांभाळत आहेत का?

तृप्ती देईंनी यावेळी धनंजय मुंडे हेच अजित पवारांच्या नावाने बीडचे पालकमंत्रिपद सांभाळत असल्याचाही आरोप केला. त्या म्हणाल्या, आजही बीड पोलिस दलातील अनेक अधिकारी वाल्मीक कराडला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, येथील पालकमंत्रिपद आजही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अजित पवार तर कुठे दिसत नाहीत. ते दरवेळी आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो असा दावा करतात. पण त्यानंतरही बीडमध्ये दररोज भयंकर घटना घडत असल्याचे उजेडात येत आहे. दादा त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यामुळे अजित पवार पालकमंत्रिपद चालवत आहेत की त्यांच्या नावाने धनंजय मुंडे हेच कारभार पाहत आहेत हे कळत नाही.

आम्ही दिलेले पुरावे अत्यंत अचूक

ज्या पद्धतीने आष्टीची घटना पुढे आली, खोक्या भोसलेची घटना पुढे आली, नागरगोजे नामक शिक्षकाची घटना घडली आहे. मग पालकमंत्री काय करत आहेत? पालकमंत्री बदलून काही फरक पडला आहे का? जर झाला नसेल, तर गुंडाराज थांबवता येत नसेल तर अधिवेशनातच या प्रकरणी योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. पण तसा निर्णय घेताना कुणीही दिसत नाही. बीडला खरेच गुन्हेगारीमुक्त करायचे असेल, तर गुंडांना पाठिशी घालणारे, त्यांना आश्रय देणाऱ्या पोलिसांना जिल्ह्याबाहेर पाठवावे लागेल. धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीने झाला नाही. शेवटी काही पुरावे आल्यानंतर तो घ्यावा लागला. आम्ही सादर केलेले पुरावे अत्यंत अचूक आहेत. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

Monday 17th of March 2025 06:26 PM

Advertisement

Advertisement