माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी अंबाजोगाई पिपल्स बँकेस सदिच्छा भेट
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी नुकतीच अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बँकेचे मुख्यालय सहकार भवन येथे अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते धिरज देशमुख यांचा फेटा बांधून तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पिपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी,कापूस पणन महासंघाचे संचालक ऍड विष्णुपंत सोळंके , बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, सुनील वाघाळकर, गणेश मसने, ऍड अनिल लोमटे हे उपस्थित होते.
या सदिच्छा भेटी दरम्यान धिरज देशमुख तथा राजकिशोर मोदी यांच्यामध्ये बँकिंग क्षेत्रातील विविध विषयावर सखोल चर्चा झाली. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या विविध योजनाबाबत देखील चर्चा झाली. ५५० कोटीच्या ठेवी तसेच १९ कोटी गुंतवणूकीच्या माध्यमातून आज अंबाजोगाई पिपल्स बँक महाराष्ट्र भर ग्राहकांना सेवा पुरवत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी नमूद केले. अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या कार्यरत वीस शाखाबद्दल सविस्तर माहिती देतांनाच भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच निलंगा, मुरुड, केज या नवीन तीन शाखांना परवानगी दिल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेचा सुरू असलेल्या व्यवसाय, बँकेची सतत वाढत असलेली वृद्धी तसेच हजारो ग्राहकांनी बँकेवर ठेवलेला विश्वास हे पाहून धिरज विलासराव देशमुख यांनी अतिशय आनंद व्यक्त करत यापूर्वी बँकेची दिवसेंदिवस अशीच भरभराट होवो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
दोन्ही नेत्यांच्या या भेटीदरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा झाली. गढूळ झालेले सध्याचे राजकारण व त्यास दिला जाणारा जातीय रंग याबाबत चिंता व्यक्त करत हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे देखील याप्रसंगी चर्चिले गेले.
