प्रेमसंबंधाच्या संशयावरून ट्रकचालक तरुणाची हत्या
बीड जिल्ह्यात प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका तरुणाला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात दहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव विकास अण्णा बनसोडे (वय २३) असून, तो जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील रहिवासी होता. आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या ट्रकवर तो तीन वर्षांपासून चालक होता. काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आले होते. मात्र, तो दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथे मित्रासह आला होता. याचदरम्यान भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी विकासचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना आला.
या काणावरून आरोपींनी संगनमत करून विकासला दोरी आणि वायरच्या सहाय्याने अमानुष मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपींनी मृतदेह चारचाकी वाहनात टाकून कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला आणि पसार झाले. या हत्येपूर्वी दोन दिवस बेदम मारहाण करतानाच विकासच्या फोनवरून त्याच्या आई-वडिलांना बोलावण्यात आले होते. "लवकर या, आल्यावर सांगतो काय झाले," असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी मृत युवकाच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भानुदास क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे या दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर यांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
