अंबाजोगाईत प्लास्टिक संकलन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
ज्ञान प्रबोधिनी निवेदिता गट आणि नगरपालिका अंबाजोगाई यांच्या संयुक्त उपक्रम
अंबाजोगाई : ज्ञान प्रबोधिनी निवेदिता गट आणि नगरपालिका अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक संकलन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा समारंभ योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या नागापूरकर सभागृहामध्ये पार पडला.
या स्पर्धेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला घरातील प्लास्टिक स्वच्छ करून आणि कोरडे करून निवेदिता गटाकडे जमा करायचे होते. हा उपक्रम २० नोव्हेंबर २०२३ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबवण्यात आला. सातत्याने, स्वच्छ आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक संकलन करणाऱ्या गृहिणींना गौरविण्यात आले. जमा झालेले संपूर्ण प्लास्टिक रिसायकलिंगसाठी पाठवण्यात आले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मा. प्रियंका टोंगे होत्या. स्वच्छता निरीक्षक मा. अनंत वेडे, समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा, माजी नगरसेविका सविताताई लोमटे व संगीता ताई व्यवहारे हे मान्यवर उपस्थित होते. ज्ञान प्रबोधिनीचे प्रमुख व मार्गदर्शक प्रसाद दादा चिक्षे यांनी या गटाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा यांनी या संकलित प्लास्टिकला सध्या लातूर येथे पाठवावे लागते, मात्र भविष्यात असे रिसायकलिंग युनिट अंबाजोगाईत सुरू करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावर मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी अशा युनिटसाठी आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच उपस्थित महिलांना आपापल्या घरातील कचरा ओला व सुका वेगळा करून घंटागाडीत टाकण्याचे आवाहन केले.
प्लास्टिक संकलन बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. अमृता चिक्षे यांनी प्रथम, जयश्री दहिफळे यांनी द्वितीय आणि सविता कराड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच प्रभाग ६ मधील सौ. अंजना शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रभाग ६ व्यतिरिक्त पार्वती धाकतोंडे, मुक्ता बागवाले आणि तोंडारे सर यांना देखील उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय, ९४ महिलांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या वर्षभरात या गटाने एकूण ३५०० किलो प्लास्टिक संकलित करून ते लातूर येथील रिसायकलिंग युनिटकडे पाठवले आहे. हा उपक्रम फक्त स्पर्धेपूरता मर्यादित न ठेवता अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार या गटाने व्यक्त केला. अंबाजोगाईतील शाळांमध्येही प्लास्टिक संकलन स्पर्धा घेतली जात असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सारिका बुरगे आणि मनीषा वालेकर यांनी केले. आभार प्रदर्शन तिलोत्तमा पतकराव यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. शुभदा लोहिया, डॉ. सीमा लोमटे, डॉ. नयन लोमटे, डॉ. प्रिया मुळे, स्मिता जोशी, रूपाली मुकादम, संगीता कराड, डॉ. कल्पना मुळावकर, डॉ. गौरी कुलकर्णी यांच्यासह प्रभाग ६ मधील आणि इतर ठिकाणच्या अनेक महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
