हनुमंत पिंपरी, माळेगाव विद्युत उपकेंद्रांना मिळाले ५ एमव्हीएचे नवीन रोहित्र
आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश
केज - केज तालुक्यातील माळेगाव आणि हनुमंत पिंपरी येथील विद्युत उपकेंद्रांच्या क्षमता वाढीसाठी दोन अतिरिक्त ५ एमव्हीएचे ट्रान्सफार्मर उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विशेष प्रयत्न व पाठपुरावा केला. ट्रान्सफार्मरमुळे दोन्ही उपकेंद्रांच्या आजूबाजूंच्या गावच्या शेतातील कृषी पंपांचा विजेचा गंभीर प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
केज तालुक्यातील माळेगाव व हनुमंत पिंपरी उपकेंद्राची क्षमता कमी पडत असल्याने सहा एजी फिडर करून दिवसाला केवळ चार तास कृषी पंपांना अडखळत वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र ठरवून दिलेल्या वेळेतही काही दिवसापासून घरगुती व शेतीपंपांचा वीज पुरवठा ओव्हरलोडमुळे अचानक खंडित होत होता.त्यामुळे शेतकरी व वीज ग्राहक यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. सध्या उन्हाचा पारा वाढल्याने पिकांना पाण्याची जास्त आवश्यकता असते. अशावेळी महावितरण कडून कृषी पंपांना केवळ चार तास थ्री फेज वीजपुरवठा होत होता मात्र लाईट अभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे भाजीपाला, ऊस, फळबागा पिके पाण्याअभावी सुकून जाऊ लागले होते. पिकांची वाढ खुंटली होती. पुरेसा अखंडितपणे वीज पुरवठा होत नसल्याने उन्हाळ्यात पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढवावी ही मागणी मागील दोन वर्षांपासून होत होती. या विजेच्या प्रश्नाला केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी गंभीरपणे घेत तातडीने लक्ष घालून महावितरण कंपनीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात पाठपुरावा करून दोन ५ एमव्हीए ट्रांसफार्मर तात्काळ उपलब्ध करून दिले आहेत. या संदर्भात आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी माहिती देताना सांगितले की, "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून पॉवर ट्रान्सफार्मर मंजूर झाले असून, भविष्यात सौर पॅनलवरून वीज निर्मिती होईल आणि या ट्रान्सफार्मरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे." या नवीन ५ एमव्हीए ट्रान्सफार्मरमुळे गेल्या काही काळात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अडचणी दूर होणार आहेत. विशेषतः शेती पंपांसाठी आवश्यक असलेली वीज नियमित व पुरेशा दाबाने मिळणार आहे, याचा फायदा परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
