Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीडमध्ये आता केवळ नावाने ओळखले जाणार पोलिस

नेमप्लेटवरून आडनाव काढले, पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा मोठा निर्णय

बीड - बीड जिल्हा गत काही महिन्यांपासून तेथील विस्कटलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे. पण आता पोलिस प्रशासनाने यावर गंभीरपणे उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनाव काढून टाकण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पोलिसांच्या छातीवरील नेमप्लेटवर यापुढे त्यांचे केवळ नाव असेल. ते केवळ आपल्या नावानेच ओळखले जातील. पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांनाच हा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा राखण्यात मदत होईल असे मानले जात आहे.

पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यासंबंधी बोलताना म्हणाले की, आम्हा पोलिसांची कुठलीही जात नाही, आमचा कुठलाही धर्म नाही, आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत. आम्ही पोलिस खात्यात काम करतो, म्हणजेच देशासाठी काम करत असतो. त्यामुळे आमची कुठलीही जात नसते, आचा कुठलाही धर्म नसतो. आम्ही कुठल्याही नागरिकाला त्याची जात अथवा त्याचा धर्म पाहून न्याय देण्याची भूमिका घेत नाही

आडनावाच्या उच्चारावरुन कसे बोलायचे ते ठरते

पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले की, अनेकदा आडनावाच्या उच्चारावरुन जात समजते. त्यामुळे आडनावाने नाही तर नावाने हाक मारण्याची प्रथा त्यांनी सुरु केली. पुढे कार्यालयीन परिपत्रके, पत्र देखील एकेरी नावानेच निघण्याची सुरुवात झाली. आता या कडीत अगदी पोलिस अधीक्षकांपासून, पोलिस कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्या छातीवर असणाऱ्या आणि पट्ट्याही बदलण्यात आल्या.

विविध गटांमध्ये एकात्मता वाढण्यासाठी निर्णय

पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार, आता कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या आडनावाने हाक मारली जाणार नाही. फक्त पहिल्या नावानेच संबोधन केले जाईल. या निर्णयामुळे समाजातील विविध गटांमध्ये एकात्मता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयानुसार, पोलिस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट्स, ओळखपत्रे आणि इतर ठिकाणीही फक्त पहिले नाव दिसेल, आडनाव दर्शवले जाणार नाही.

Thursday 13th of March 2025 06:40 PM

Advertisement

Advertisement