सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर
वन विभागाची धडक अन् कठोर कारवाई, खोक्याचे घर खात्याच्या जागेवर असल्याचा आरोप
बीड - भाजपचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर जमीनदोस्त करण्यात आले. वन विभागाच्या वतीने सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. तत्पूर्वी त्याच्या घरातील सामान बाहेर काढण्यात आले. खोक्याचे घर वन विभागाच्या जमिनीवर अधिकृतपणे असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिसही उपस्थित होते. शिरुर कासार शहरापासून काही अंतरावर वन विभागाच्या जमिनीवर खोक्या भोसलेचे घर आहे. वन विभागाच्या जागेवर घर बांधल्याने वन विभागाने या घरावर बुलडोझर चालवला.
ढाकणे पिता-पुत्राला मारहाण, पैशांची उधळण करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या हा चर्चेत आला होता. त्याच्यावर मागील 20 दिवसांत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून तो फरार झाला होता. पोलिसांनी काल त्याला प्रयागराज येथून अटक केली होती. मात्र, तो बीडमध्ये येण्याआधीच त्याला वन विभागाने मोठा धक्का दिला आहे. वन विभागाच्या जमिनीवर असलेले त्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली होती. या कारवाईत खोक्याच्या घरात शिकारीसाठी लागणारे साहित्य, प्राण्यांचे मांस सापडले होते. त्यानंतर त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला होता.
वन विभागाच्या गट क्रमांक 51 वर सतीश उर्फ खोक्या भोसलेने अतिक्रमण करून घर बांधले होते. याप्रकरणी वन विभागाने सतीश भोसलेवर गुन्हा देखील दाखल केला होता. तसेच या जागेसाठी मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. सात दिवसात मालकी हक्क दावा दाखल न केल्यास पुढील कारवाई करून अतिक्रमण करून बांधलेले घर पाडण्याचा इशारा वन विभागाच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार सात दिवसांत मालकी हक्क दावा दाखल न झाल्याने वन विभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर तोडक कारवाई करण्यात आली. गेल्या 20 दिवसांत शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात 3 आणि वन विभागाच्या वतीने 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
