महाबोधी बुद्धविहारासाठी रिपाइंची केज तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
केज - बुद्धगया येथील महाबोधी विहार पूर्णपणे बौद्धाच्या ताब्यात द्यावा. बुद्धगया महाबोधी विहारविषयी १९४९ चा कायदा रद्द करावा या प्रमुख मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका केजच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बुधवारी जोरदार तीव्र निदर्शने करण्यात आली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार व युवा रिपाइंचे प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइंचे केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी बुद्ध विहार बौध्द अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावे, बौध्द स्थळांना संरक्षण देवून बौध्द स्थळाच्या पर्यटन विकासासाठी भारत सरकारने जास्तीत जास्त आर्थिक निधी उपलब्ध करुन द्यावा, बौध्द भिक्कुंना संरक्षण देण्यात यावे या मागण्यासाठी बुधवारी येथील तहसील कार्यालयासमोर रिपाइंच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी हातात फलक आणि निळे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, तालुका उपाध्यक्ष रमेश निशिगंध, दिलीप बनसोडे, प्रशांत हजारे, सुरज काळे हे उपस्थित होते.
