बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला
आज प्रयागराज कोर्टात हजर करणार, बीडमधून केले हद्दपार
बीड - बीडवरुन गेलेल्या पोलिस पथकाने खोक्या भोसलेचा ताबा घेतला. आज 11 वाजता त्याला प्रयागराज येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल यूपी पोलिसांनी सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला प्रयागराज येथून ताब्यात घेतले होते. शुक्रवारी सकाळी त्याला बंदोबस्तात बीडला आणले जाणार आहे.
दरम्यान खोक्याने केलेल्या मारहाणीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या चर्चेत आला होता. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तक्रार देत त्याच्यावर 6 मार्चला गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर हरणाच्या शिकारीला विरोध केल्यामुळे त्याने बावी येथील शेतकरी पिता-पुत्राला मारहाण केल्याचाही प्रकार समोर आल्याने दुसरा गुन्हा नोंदवला गेला होता. खोक्याने 200 हरणांची शिकार केल्याचा आरोप झाला होता. त्याच्या अटकेसाठी मोर्चाही निघाला होता. त्यामुळे वनविभागाने त्याच्या घरावर छापा टाकला. यात शिकारीचे जाळे, मांस व गांजा जप्त केला होता. बुधवारी 600 ग्रॅम गांजा घरात बाळगल्याप्रकरणी तिसरा गुन्हा त्याच्यावर नोंद झाला. भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याने खोक्या गुन्हेगारी कारवाया करत असून त्याच्यावर अद्याप कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केली होता. त्यामुळे आमदार धस अडचणीत आले होते.
सतीश भोसले याला अटक झाली ही चांगली बाब आहे. त्याने चूक केली आहे म्हणून अटक झाली. आता कायद्याप्रमाणे कठोर कारवाई होईल. मी सतीश भोसलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप खोटा आहे. मी यामध्ये अजिबात हस्तक्षेप केला नाही. त्याने चूक केली तर कारवाई करा असे मी पूर्वीच म्हटले होते, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
प्रयागराजमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या‘खोक्या’वर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी वर्षभरापूर्वीच प्रस्ताव पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. मात्र हा प्रस्ताव प्रलंबित होता. आता खोक्याचर्चेत आल्याने पुन्हा याप्रस्तावावर काम सुरू झाले होते. एसडीएम कविता जाधवयांनी बुधवारी खोक्याला बीड जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. तसे पत्र शिरूर पोलिसांना दिले आहे.
