संतोष देशमुख हत्येमुळे यंदा विड्यात जावयाची गर्दभ सवारी निघणार नाही, जावईबापूंना दिलासा
निजामकालीन परंपरेला दुसऱ्यांदा खंड
केज - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येचे प्रकरण मागील तीन महिन्यापासून राज्यभर गाजत आहे. या शेजारच्या गावात घडलेल्या दुःखद घटनेमुळे विडा (ता. केज) येथील ग्रामस्थांनी यंदा धुळवडीला जावयाची गाढवावरून मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निजामकालीन परंपरेला कोरोना नंतर दुसऱ्यांदा खंड पडत असून गर्दभ सवारी निघणार नसल्याने जावईबापूंना दिलासा मिळाला आहे.
विडा येथील निजाम कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांनी धुलीवंदनाच्या सणाला सासुरवाडी विडा येथे आलेल्या बाळानाथ चिंचोली ( जि. लातूर ) येथील मेव्हण्याची थट्टामस्करीतून गाढवावर बसून सवारी काढली होती. तेव्हापासून धुलीवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा रूढ झाली. जावई शोध समिती ही जावईबापूला पकडून आणून धुलीवंदनाच्या दिवशी ग्रामपंचायतीसमोर चपलेचा हार घातलेल्या गाढवावर बसवून मिरवणुकीला सुरवात केली जाते. रंगाची उधळण करीत वाजत गाजत गावातील प्रमुख रस्त्यांवरुन मिरवणूक काढून ग्रामदैवत राजा हनुमान मंदीरासमोर लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेला कपड्यांचा आहेर जावई बापूला चढविला जातो. तर सासऱ्याच्या ऐपतीप्रमाणे सोन्याची अंगठी ही भेट दिली जाते. गावाची परंपरा मानून मिरवणुकीत कधीही भांडण - तंटा, मान - अपमान असा प्रकार घडलेला नसून सर्व जाती - धर्मांच्या जावयांना या गावकऱ्यांनी मिरवले असून गावकऱ्यांनी सामाजिक एकोपा व सलोखा जपलेला आहे. तर गावात सोयरिक झालेले दीडशेहुन अधिक जावई असून त्यापैकी ४० जावायांची विडेकरांनी मिरवणूक काढली आहे.
यंदा धुळवडीचा सण तोंडावर ठेवून ठेपल्याने कोणत्या जावयाची मिरवणूक निघणार याकडे लक्ष लागले होते. मात्र विडेकरांनी शेजाऱ्याच्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याने या दुःख घटनेवरून यंदा जावयाची गाढवावरून मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला असून माजी उपसरपंच बी. आर. देशमुख, बाळू पटाईत, उत्तम देशमुख, बाबू काळे, खमरू कुरेशी यांनी तसे निवेदन सरपंच सुरज पटाईत यांना दिले आहे. त्यामुळे निजामकालीन परंपरेला कोरोना नंतर दुसऱ्यांदा खंड पडत असून गर्दभ सवारी निघणार नसल्याने जावईबापूंना दिलासा मिळाला आहे.
यंदा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दुःखद घटनेमुळे धुलीवंदनाच्य सणाला जावईबापूंची गाढवावरून काढण्यात येणार नसून पुढील वर्षी ही परंपरा पुन्हा सुरळितपणे चालू राहील.
सुरज पटाईत ; सरपंच, विडा.
