संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी संपली: पुढील सुनावणी 26 तारखेला
उज्ज्वल निकम गैरहजर तर वाल्मीक कराडने वकील बदलला
बीड - बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज पहिली सुनावणी होणार आहे. राज्य भर चर्चेचा विषय ठरणाऱ्या या प्रकरणात आरोपींना मकोका कायदा अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच वाल्मीक कराडवर खंडणीसह इतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात उज्वल निकम आज न्यायालयात हजर राहणार नाहीत. दुसरीकडे वाल्मिक कराडने आपला वकील बदलला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हीसीद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान पहिल्या सुनावणीच्या वेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचे वकील हे दोषारोपपत्रात नसलेली महत्त्वाची माहिती मागणार आहेत. दोषारोप पत्र सादर करताना त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब आणि आरोपीचे जबाब तसेच फोन कॉल्स संदर्भातील माहिती नव्हती. ती सर्व माहिती आरोपीचे वकील आज न्यायालयात मागणार आहेत. तसेच सगळ्या फोन कॉलचे सीडीआर देखील आरोपीचे वकील मागणार आहेत.
कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांचा सीआयडीला जबाब
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडने अवादा कंपनीकडून एकदा नव्हे, तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात याचा उल्लेख केला आहे.
28 ऑगस्ट 2024 रोजी वाल्मीकने पहिल्यांदा फोन करून खंडणी मागितली. परळीत येऊन भेटा, नाहीतर काम बंद करा, अशी धमकी दिली. 11 सप्टेंबर 2024 रोजी दुसऱ्यांदा फोन करून बीड जिल्ह्यातील सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला आणा, असे सांगितले. 8 ऑक्टोबर 2024 रोजी परळीतील जगमित्र कार्यालयात वाल्मीक, विष्णू चाटे आणि शिवाजी थोपटे यांची भेट झाली. प्लांट सुरू ठेवायचा असेल, तर दोन कोटी रुपये द्या. नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट चालू ठेवू देणार नाही, अशी धमकी दिली. नंतर 26 नोव्हेंबर 2024 रोजी चौथ्यांदा आरोपी सुदर्शन घुले कंपनीत आला. दोन कोटी रुपये दिले नाही, तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही, असे म्हणत धमकी दिली. 29 नोव्हेंबर 2024 रोजी विष्णू चाटेने सकाळी 11:30 वाजता फोन केला. वाल्मीकने काम बंद करण्याचा इशारा दिला. त्याच दिवशी संध्याकाळी सुदर्शन घुले कंपनी ऑफिसमध्ये आला. वाल्मीक अण्णांची मागणी लवकर पूर्ण करा, असे धमकावले असल्याचे अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबत सांगितले आहे.
