मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईची नूतन कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी डॉ.राहुल धाकडे, उपाध्यक्षपदी प्रा.डॉ.शैलजा बरूरे तर सचिवपदी गोरख शेंद्रे
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - येथील मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईची नूतन कार्यकारिणी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे. यात सर्वानूमते डॉ.राहुल धाकडे (अध्यक्ष), प्रा.डॉ.शैलजा बरूरे (उपाध्यक्ष), मंजुषा कुलकर्णी (कोषाध्यक्ष), गोरख शेंद्रे (सचिव) आणि भागवत मसने (सहसचिव) असणार आहेत. या कार्यकारिणीत सदस्य म्हणून विद्याधर पांडे (मुकुंदराज कवी संमेलन), अनिरूद्ध चौसाळकर (मासिक मैफल), प्रा.सतीश घाडगे (विशेष उपक्रम), प्रा.संतोष मोहिते (प्रसिद्धी व तंत्रज्ञान), प्रा.रोहिणी अंकुश (भाषा दिन), प्रा.डॉ.कल्पना बेलोकर-मुळावकर (दिन विशेष) आणि निमंत्रित म्हणून अमर हबीब (मार्गदर्शक), तिलोत्तमा पतकराव (महिला तसेच स्पर्धा) या सोबतच पदसिद्ध म्हणून दगडू लोमटे (केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी अध्यक्ष), बालाजी सुतार (११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष), सुदर्शन रापतवार (११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष), अनिकेत लोहिया (नियोजित दुसऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष) यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीचे शहरातील साहित्य वर्तुळातून स्वागत होत आहे.
अध्यक्षपदी डॉ.राहुल धाकडे :
विद्यार्थी दशेपसूनच डॉ.राहुल धाकडे हे आंबेडकरी चळवळ, सम्यक विद्यार्थी आंदोलन ते एक उपासक म्हणून सामाजिक धम्म चळवळी मध्ये सक्रिय सहभाग घेऊन तन-मन-धनाने काम करणारे कार्यकर्ते आहेत. मानवतावाद हा एकच धर्म असे मानून त्या मानवतेसाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ.धाकडे ओळखले जातात. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. यापूर्वी आशा आयसीयूच्या माध्यमातून त्यांनी बांधिलकी जोपासत गरजूंना दर्जेदार रूग्णसेवा दिली आहे. शिक्षक दिनानिमित्त ते अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने शिक्षक अवार्ड प्रदान करतात. ते एक ऑल रांऊडर, अभ्यासू, मनमिळाऊ, शांतसंयमी, कुशल संघटक, सामाजिक कार्यात अग्रेसर, हजारो रूग्णांना जीवनदान देणारे प्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (ऍम्पा) या अंबाजोगाई तालुक्यातील सर्व वैद्यकीय शाखा सर्व डॉक्टरांच्या संघटनेची स्थापना केली. पहिली कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली. अध्यक्ष म्हणून डॉ.राहुल धाकडे यांची निवड करण्यात आली. या माध्यमातून त्यांनी आयपीएलच्या धर्तीवर 'ऍम्पा क्रिकेट कप' स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. तसेच डाॅक्टर्स बांधवांसाठी ते सर्व सन्माननिय डाॅक्टर्स बंधू-भगिणी यांना सोबत घेऊन असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. यासोबतच अंबाजोगाईत मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाची सुरूवात केली, तसेच बुध्दीस्ट फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून भव्य धम्म महोत्सवाचे आयोजन करणारे डॉ.धाकडे हे भीम जन्मभूमी, राष्ट्रीय स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, डॉ.आंबेडकर नगर (महु.), मध्यप्रदेशचे कार्यकारणी सदस्य ही आहेत. डॉ.धाकडे यांनी यापूर्वी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविले आहे. तसेच ते मराठवाडा साहित्य परिषद अंबाजोगाई शाखेचे यापूर्वी उपाध्यक्ष ही होते. मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे व्हावे यासाठीच्या पाठपुराव्यामध्ये त्यांचा ही सहभाग राहिला आहे. शहरात साहित्यिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात डॉ.धाकडे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण व सर्वंकष कामगिरीची दखल घेऊन सर्वानुमते डॉ.राहूल धाकडे यांची मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा व सातत्यपूर्ण कार्याचा फायदा मसाप शाखा अंबाजोगाईला होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
