धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे आमच्यावर मुद्दाम आरोप - प्रकाश सोळंके
माजलगाव - संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंना विरोध केला, त्यांची कुठली ना कुठली प्रकरणे शोधून त्यामध्ये गुंडगिरी करतोय, असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशील सोळंके प्रकरण, तहसीलदारांना शिवीगाळ प्रकरण तसेच त्यांच्या 10 ते 12 कोटी निवडणूक खर्चाच्या विधानावरही स्पष्टीकरण दिले.
सुशील सोळंकेचे प्रकरण महिलांना अश्लील बोलल्यामुळे झाले. तहसीलदारांचे प्रकरण हे तिने शेतकऱ्यांचे पाणी तोडताना बळाचा वापर केल्यामुळे झाले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिले.
सुशील सोळंके यांचे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याची पार्श्वभूमी अशी की, त्याची आई सादोळा या गावच्या सरपंच आहेत. त्याठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य या महिला आहेत. या महिलांची एक ट्रिप गणपती पुळे आणि नानज ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी बस करून गेली होती. विरोधकांनी एका ग्रामपंचायत सदस्याच्या घरी जाऊन तुम्ही तुमच्या बायका गोव्याला का पाठवल्या. तेथे अर्धनग्न अवस्थेत नृत्य केले, असा आरोप केला. त्याबाबतचा एफआयआर सुद्धा अशोक सोळंके ज्याला मारहाण झाली त्याच्यावर दाखल झालेला आहे. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी सुशील सोळंके गेला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. तिथे त्याने बोलताना अरेरावी झाली. त्यामुळे ते मारहाणीचे प्रकरण झाले. त्याबद्दल सुशील सोळंके याच्यावर त्याच दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या माध्यमातून त्याला अंतरिम जामीन मिळालेला आहे. त्यामुळे सुशील सोळंकेला अटक करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
प्रकाश सोळंके यांनी तहसीलदाराच्या बाबतीतही स्पष्टीकरण दिले. तात्कालिन तहसीलदार शेतकऱ्यांचे नदीमध्ये वीजेचे जे कनेक्शन आहेत. ते तोडण्यासाठी त्या गावात गेल्या होत्या. त्या गावातील सर्व महिला आणि पुरुष वीज कनेक्शन तोडण्यासाठी तहसीलदारांना विरोध करत होते. त्यावेळी बाहेर गावातील 500 लोक महादपुरी गावात आले. त्या तहसीलदाराला घेराव घातला. तहसीलदाराच्या जीवाला धोका निर्माण झाला. म्हणून तात्कालिन जिल्हाधिकारी मुंढे मॅडम यांनी मला फोन करून त्या घटनेबाबत सांगितले. मला स्वत: तिथे जाण्यास सांगितले. मी स्वत: तिथे गेलो. लोकांना बाजुला करून शांत केले आणि तहसीलदारांची गाडी गावाच्या बाहेर काढून दिली. त्यावेळेस लोकांच्या भावना खूप प्रक्षोभक होत्या. कारण आपल्या पिकाचे पाणी तोडले जाणार, ही भावना शेतकऱ्यांना मान्य होत नाही. तहसीलदारांनी समजुतीच्या माध्यमातून प्रयत्न करायला पाहिजे होते. परंतू त्यांनी बळाचा वापर केल्याने लोकांच्या भावना प्रक्षोभक होत्या आणि त्यांनी घेराव घालून तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न होता, असे स्पष्टीकरण प्रकाश सोळंके यांनी केले.
कोटी चुकून बोललो, निवडणुकीत लाखात खर्च केला
मी फक्त 10 ते 12 कोटी रुपये खर्चून विधानसभा निवडणूक जिंकल्याचे वक्तव्य सोळंके यांनी केले होते. यावर बोलताना मी ते भाषणात बोललो होते. भाषणात बोललेले सत्य असते का? असा प्रतिसवाल प्रकाश सोळंके यांनी केला. विनोदातून ते वक्तव्य माझ्या तोंडून निघून गेले. विरोधकांनी एवढे खर्च केले, मी खूप कमी खर्च केला, पण निवडून आलो. एवढीच त्यामागची भावना असल्याचे सोळंके म्हणाले. कोटी हे चुकून आले, असे मी भाषण झाल्याबरोबरच सांगितले. लाखात खर्च असल्याचे मी तेव्हा जाहीर केले. मला जी मर्यादा घालून देण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जी काही मर्यादा असते, 40 लाखांचे पैसे मला पक्षाने पाठवले होते. त्यापैकी 23 लाख रुपये खर्च झाला. उरलेला पैसा मी पक्षाला परत केला. पक्षाने अधिकृतपणे चेकद्वारे हे पैसे माझ्या बँकेच्या खात्यात दिले. आमच्या पक्षाने प्रत्येकाला पैसे दिले. मी प्रतिज्ञापत्रातही बरोबर उल्लेख केलेला आहे.
जुनी प्रकरणे उकरून काढणे बरोबर नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता माध्यमांनी आमची दोन-दोन, तीन-तीन वर्षांपूर्वीचे प्रकरणे उकरून काढायचे हे बरोबर नाही. तुम्ही त्याच वेळेस दाखवले असते, तर आम्ही काहीच म्हणालो नसतो. जुनी प्रकरणे दाखवायची, हा आका आहे, तो आका आहे, हा गुंडगिरी करतो. या जुन्या प्रकरणांचे व्हिडिओ सुरुवातील सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. त्यानंतर त्याची दखल प्रसारमाध्यमे घेत आहेत. हा सोशल मीडियाचा आता वॉर सुरू झालेला आहे. या सर्व प्रकराला बीडचे राजकारण देखील कारणीभूत असल्याचे प्रकाश सोळंके म्हणाले. संतोष देशमुखांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. एखाद्याला मारहाण झाली, तर त्याचे पडसाद राज्यभर पडतात का? असा सवालही सोळंके यांनी केला.
