घरावर संकट आल्याची भीती दाखवत महिलेची फसवणूक; 80 हजार रुपयांचा गंडा
बीड : शहरातील आनंद नगर परिसरात राहणाऱ्या एका 63 वर्षीय महिलेची दोन अनोळखी इसमांनी मोठ्या चलाखीने फसवणूक केली. घरावर संकट असल्याची भीती दाखवत, तिच्याकडून 80,500 रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी घेऊन आरोपी फरार झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुनिता श्रीपाद देशपांडे असे त्या फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 3 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्या घरी आले. त्यांनी स्वतःला स्वामी भक्त असल्याचे सांगून घरावर आणि नातवास मोठे संकट असल्याचे भासवले. ते बरे करायचे असेल तर तुम्ही आम्हाला थोडीफार मदत करा असे सांगून त्यांनी शिट्टी वाजवली व सुनिताबाई यांच्या तोंडावर काही तरी फेकले. त्यानंतर पूजाविधीच्या नावाखाली त्यांनी काही हळद-कुंकू लावलेल्या सहा पुड्या दिल्या आणि संकट दूर झाल्याचा दावा केला. यावेळी भामट्यांनी सुनिताबाईंना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून 50 हजार 500 रुपये रोख आणि 5 ग्रॅम वजनाची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी घेतली. त्यानंतर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये एक क्रमांक सेव्ह करून दिला आणि परत येण्याचे सांगून पसार झाले. यानंतर महिलेने मुलाला घडलेली घटना सांगितली असता, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
