लिनेस क्लब अंबाजोगाईच्या वतीने महिला दिनानिमित्त सफाई कामगार महिलांचा सन्मान
अंबाजोगाई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत, लिनेस क्लब अंबाजोगाई च्या वतीने शहरातील सफाई कामगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे समाजाच्या स्वच्छतेसाठी अविरत परिश्रम करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
शहरातील सफाई कामगार महिला भल्या पहाटे कामावर येत शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडत असतात. शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण जाणीव समाजाला करून देण्याच्या हेतूने लिनेस क्लब अंबाजोगाई च्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषद परिसरात हा छोटेखानी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात कांताबाई किसन समुकराव, शालुबाई वैद्य, लताबाई वाघमारे, वंदना सरवदे, केशरबाई जोगदंड या सफाई कामगारांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला. यावेळी शहराच्या स्वच्छतेच्या व्यवस्थापनात मोलाचा वाटा असलेल्या अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांचाही लिनेस क्लब अंबाजोगाईच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांच्या सन्मानासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. समाजातील प्रत्येक घटकाने या सफाई कर्मचारी महिलांच्या योगदानाची कदर केली पाहिजे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या विशेष सोहळ्याला लिनेस क्लबच्या लिनेस क्लबच्या अध्यक्षा लि. आशा वाघमारे, उपाध्यक्ष लि. वर्षा देशमुख, कोषाध्यक्ष लि. अयोध्या गाठाळ, सचिव लि. ललिता पुजारी, वरिष्ठ सदस्य लि. भागीरथी वाडेकर, कॅबिनेट ऑफिसर लि. प्रभावती आवचार-तट, लि. प्रतिभा देशमुख, लि. विजया खोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
