बीडच्या सद्भावना यात्रेचा सकारात्मक संदेश संपूर्ण महाराष्ट्रात
हारतुरे नाकारत स्टेजवर न बसण्याचाही पाडला पायंडा
बीड - मागच्या कांही महिन्यांपासून बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्यावर रामबाण उपाय म्हणून काढण्यात आलेली सद्भावना यात्रेचा समारोप बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला सद्भावना यात्रेचा पहिला उपक्रम बीड जिल्ह्याने लिलल्या पार पाडला. सामाजिक सलोखा वाढीस लागावा या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात सद्भावना पदयात्रा निघणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा मस्साजोग ते बीड दरम्यान संपन्न झाला. मस्साजोग येथे स्व. संतोष देशमुख यांना आदरांजली वाहून पद यात्रेला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनी ताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याने पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.
सदरील पदयात्रा बीडमध्ये आल्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून समारोपासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनी ताई पाटील, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, कल्याण काळे, माजीमंत्री अशोकराव पाटील, वसंत पुरके, बाळासाहेब थोरात, सुरेश वरपूडकर, आ. राठोड, प्रभारी कुणाल चौधरी, सुशीला मोराळे, आदित्य पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, रवींद्र दळवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात देशमुख कुटुंबात एवढे दुःख असताना सत्कार स्वीकारण्याचे धाडस झाले नाही. खरा तो एकची धर्म या युक्ती प्रमाणे सलोखा आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून केला. सदरील पद यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सामील झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे सपकाळ यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेण्याचे काम पांडुरंगाने केले म्हणून समाजमनाचा विषय वाढीस लागला.तसेच पद यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल राहुल सोनवणे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे कौतुकही केले.
तर यावेळी खा. रजनी पाटील यांनी बीड जिल्ह्यावर विश्वास दाखवल्याबद्दल प्रदेश काँग्रेसचे आभार व्यक्त करत समाधानही व्यक्त केले. तर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपक्रमाचे कौतुक करत असेच उपक्रम राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खा.कल्याण काळे, सुशीला मोराळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रम सुरू करताना संयोजक सत्कारची तयारी करत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी स्टेजवर कुणी बसणार नाहीत आणि हारतुरे पण कुणीही स्वीकारणार नाहीत असे स्पष्ट करत सर्वांच्या सोबत समोर बसत सत्काराचे सोपस्कार नाकारत नवीन पायंडा पाडला.
सभागृह पडले अपुरे.....!
सद्भावना यात्रेचा समारोपप्रसंगी हजारो नागरिक सभागृहात उपस्थित राहिल्याने बाल्कनीसह संपूर्ण सभागृह खचाखच भरल्याने अनेक नागरिकांना बाहेर उभे राहून विचार ऐकावे लागले.
