कुंबेफळमध्ये भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
केज : तालुक्यातील कुंबेफळ येथे घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.
तक्रारदार भिमराव शंकरराव ढोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता ते आणि त्यांच्या पत्नी शेतीच्या कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते. सायंकाळी 6.30 वाजता परत आल्यानंतर त्यांना घराचे बाहेरील कुलूप तुटलेले आढळले.
घरात प्रवेश करताच सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तसेच लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 2,51,300 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. युसुफ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.
