Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

धनंजय मुंडेंच्या कृषीमंत्रीपदाच्या काळात २७५ कोटींचा घोटाळा; अंजली दमानिया यांचा खळबळजनक आरोप

मुंबई - राज्यातील लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी हा भ्रष्टाचार उघड करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

275 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा

दमानिया यांच्या मते, या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान आणि योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, लाभ हस्तांतर योजनेअंतर्गत दोन टेंडर मिळून तब्बल 275 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या टेंडरबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) विचारणा केल्यानंतरही संबंधित माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

या प्रकरणात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या कार्यकाळातील व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याने शेतकऱ्यांना मिळणारा पैसा वाया गेला असून, तो परत मिळवून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे वितरित करावा, असेही त्या म्हणाल्या.

कृषी विभागातील गैरव्यवहार

दमानिया यांनी कृषी विभागाने केलेल्या विविध आर्थिक गैरव्यवहारांवरही प्रकाश टाकला आहे. त्यानुसार:

577 रुपयांच्या बॅग 1,200 रुपयांना खरेदी करण्यात आल्या.

2,400 रुपयांचे पंप तब्बल 3,500 रुपयांना विकत घेण्यात आले.

92 रुपयांची नॅनो युरियाची बाटली 220 रुपयांना खरेदी झाली.

निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा?

दमानिया यांच्या मते, निविदा प्रक्रिया पार पाडण्यापूर्वीच संबंधित कंपन्यांना पैसे दिले गेले.

16 मार्च 2024: कच्चा माल खरेदीसाठी निधी वितरित केला गेला.

30 मार्च 2024: या निधीसाठी निविदा काढण्यात आली.

28 मार्च 2024: बॅटरी स्पेअर खरेदीसाठी पैसे दिले गेले.

5 एप्रिल 2024: या खरेदीसाठी निविदा जाहीर केली गेली.

यावरून, आधीच पैसे देण्यात आले होते आणि नंतर निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, कापूस साठवणुकीसाठी लागणाऱ्या बॅग्सचे पैसे 16 मार्च रोजी देण्यात आले, पण त्यासाठीची निविदा मात्र महिनाभरानंतर काढण्यात आली.

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. त्यांनी भगवानगड संस्थानलाही धनंजय मुंडेंवरील समर्थन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Tuesday 4th of February 2025 12:31 PM

Advertisement

Advertisement