चांदापुर येथे अकराव्या बौद्धधम्म परिषदेचा शानदार समारोप
भारत ही बुद्धभूमी : बाबासाहेबांच्या विचारांची जगाला गरज ; 'विपश्यना' साठी ही भुमी योग्य - पुज्य भिक्खू डॉ.लि.ची.रान
अंबाजोगाई - परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा - क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी अकराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून पुज्य भिक्खू थेर इम चांग व्वू (मुख्य संस्थापक, बुलम्वांगडोंगजोल विहार, दक्षिण कोरिया) तर विशेष अतिथी म्हणून पुज्य भिक्खू डॉ.लि.ची.रान (माजी कुलगुरू, कोरियन बुध्दीस्ट विद्यापीठ, दक्षिण कोरिया), पुज्य भिक्खू महाविरो थेरो (काळेगाव अहमदपुर), पुज्य भिक्खू धम्मशील थेरो ( शिवणी, बीड) आणि पुज्य भिक्खू पय्यावर्धन (हिंगोली) भंते मैञेय (छ संभाजी नगर) भन्ते मैञेय संबोधी( बार्शी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. या धम्म परिषदेचे 'सम्यक संकल्प' या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात आले.
मागील काही वर्षांपासून बौद्ध धम्म उपासकांसाठी नांवारूपास आलेले सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी, जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी, वसंतनगर तांडा, मौजे चांदापूर, ता.परळी येथे रविवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे अकराव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने करण्यात आली. या धम्म परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर हे होते. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय दौंड, माजी लेफ्टनंट कर्नल डॉ.एम.एच.कांबळे तर यावेळी नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, कृषी तज्ज्ञ डॉ.मधुकर खळगे, समाजभूषण आनंद वाघमारे, बौद्धाचार्य आनंद तुपसमुद्रे, मिलिंद नरबागे, श्रावण बनसोडे, महादेव बनसोडे, संग्राम गित्ते (सरपंच, चांदापुर), प्रशांत गित्ते (ग्रा.पं.सदस्य,चांदापूर.), उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, गोल्ड मेडल प्राप्त वंदना राहुल सुरवसे, बौद्धाचार्य सचिन रणखांबे तसेच प्रसिद्धीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी धम्म देसना देताना पुज्य भिक्खू माजी कुलगुरू डॉ.लि.ची.रान म्हणाले की, चांदापूर हा परिसर नैसर्गिक आहे. मेडिटेशन करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथील ध्यान केंद्राचा सर्वांना फायदा होईल. संबोधी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी अशीच जागा लागते. भारत ही बुद्धभूमी आहे. सम्राट अशोक यांनी भारतासह जगात बुध्द धम्म रूजविला. तर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्द धम्माचे पुनरूज्जीवन केले. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची जगाला गरज आहे. भारतात जीवंत बुध्दीझम पहावयास मिळतो असे गौरवोद्गार पुज्य भिक्खू डॉ.रान यांनी काढले. तर पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी आपण शुध्द झाले पाहिजे, भिक्खू तयार करणे, ज्ञानी माणसं तयार करणे हा या धम्म परिषदेचा मुख्य उद्देश आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संविधान वाचविण्यासाठी आपण सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे पुज्य भदन्त डॉ.महाथेरो म्हणाले. तर पुज्य भिक्खू पय्यावर्धन (हिंगोली) यांनी धम्म मनाची मशागत करतो, त्यामुळे धम्म पुढील पिढीला देण्यासाठी अशा धम्म परिषदा आवश्यक आहेत असे पुज्य भिक्खू पय्यावर्धन म्हणाले. तर यावेळी पुज्य भदन्त महाविरो म्हणाले की, बुध्द धम्म हा सदाचार शिकवतो, त्यामुळे सुखाच्या प्राप्तीसाठी धम्माची वाट चालावी लागेल, धम्माचा अंतिम उद्देश समजून घ्या, आधुनिक समाजात सदाचार व दुराचार यांचे युद्ध सुरू आहे. मानवाने चिंतन व मनन करावे, चिवर आणि भिक्षापात्र ही धनसंपत्ती सर्वश्रेष्ठ आहे. असे सांगून पुज्य भदन्त महाविरो यांनी कुशल कर्म, त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग, दहा पारमिता, कर्मवाद, धम्म संस्कार, दानाचे महत्व विषद केले. यावेळी पुज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी धम्म परिषदस उपस्थित उपासक, उपासिका यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार दौंड यांनी मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा - क प्राप्त) यांना शासनामार्फत आवश्यक निधी व आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी डॉ.राजेश इंगोले, डॉ.मधुकर कांबळे, प्रा.डॉ.मधुकर खळगे यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप ऍड.अनंतराव जगतकर यांनी केला. प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले. तर सुत्रसंचालन जगन सरवदे आणि सचिन रणखांबे यांनी करून उपस्थितांचे आभार राहुल सुरवसे यांनी मानले. धम्म परिषदेच्या ठिकाणी परळी ग्रामीण पोलीस यांचे सुरक्षा पथक उपलब्ध करून देण्यात आले होते. या धम्म परिषदेत महत्वपुर्ण ठराव मांडण्यात येवून ते पारित करण्यात आले. हे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. ठरावांचे वाचन प्रा.गौतम गायकवाड यांनी केले. धम्म उपासक हे पांढरे वस्त्र परिधान करून धम्म परिषदेत सहभागी झाले होते. धम्म परीषदेच्या पार्श्वभूमीवर रमाई चौक, कबीरनगर, अंबाजोगाई, जवळगाव, पुस, घाटनांदूर, उजनी, पट्टीवडगाव, नागापूर मांडवा (प), डाबी या गावांतून धम्म रॅली काढण्यात आली. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै.जि.बीड) चे पदाधिकारी धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै.जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, प्रा.गौतम गायकवाड, व्यंकट वाघमारे, सचिन वाघमारे, जगन सरवदे, विश्वनाथ भालेराव, सीमाताई इंगळे तसेच चंद्रकांत बनसोडे, शाहीर गौतम सरवदे, सुरेश कांबळे, किशोर इंगळे, आकाश वेडे, सुशिल इंगळे, नागेश जोंधळे, राहुल सुरवसे, बी.एस.बनसोडे आदींनी पुढाकार घेतला होता.
