शेतकऱ्याच्या घरात घुसून चाकूच्या धाकावर दीड लाखांची रोकड लंपास
कडा – आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील शेकडे वस्तीवर रविवारी पहाटे चार चोरट्यांनी घरात शिरून शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावून दीड लाख रुपयांची रोकड लुटली. ही घटना पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली असून, अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिंदा येथील शेतकरी मोहन शेकडे हे आपल्या कुटुंबासह शेकडे वस्तीवर राहतात. शनिवारी रात्री जेवण करून सर्व जण झोपले होते. मात्र, पहाटे २ वाजता घराची कडी तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. आवाजाने शेकडे यांना जाग आली असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावत धमकावले. तसेच आरडाओरड करू नये म्हणून त्यांचे तोंड दाबून धरले.
याच दरम्यान चोरट्यांनी घरभर शोधाशोध सुरू केली आणि पत्र्याची पेटी ताब्यात घेतली. त्याचवेळी एका चोराने घरातील वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची वस्तू तोडली, मात्र शेकडे कुटुंबाने जोरात आरडाओरड केली असता घाबरलेल्या चोरट्यांनी ते सोडून दिले आणि घरातील पेटी घेऊन पळ काढला.
शेजाऱ्यांनी आवाज ऐकून पाठलाग केला, परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. काही अंतरावर पेटी आढळली, मात्र त्यातील दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही रक्कम शेती आणि शेळी-म्हैस विक्रीतून मिळाली होती.
पोलिसांनी केला घटनास्थळी तपास
या घटनेची माहिती मिळताच आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे, अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम मंजुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी मोहन शंकर शेकडे यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांविरोधात कलम 309(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण करत आहेत.
गावात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घरफोड्या आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
