फरार आरोपीने जर पुरावे नष्ट केले तर जबाबदारी प्रशासनाची:त्यासाठीच तो फरार, आम्हाला फक्त न्याय हवा - धनंजय देशमुख
बीड - पुरावे नष्ट करण्यासाठीच गेली दोन महिने आरोपी फरार आहे. यात जर काही पुरावे नष्ट करण्यात आले तर त्यांची जबाबदारी ही यंत्रणे आणि प्रशासनाची असेल असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास त्यांनी आम्हाला न्याय द्यावा.
धनंजय देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही कालच महंत नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जात भेट घेतली. आमच्या गावात दोन टक्क्यांहून कमी गुन्हेगारी असल्याने आमच्या संपूर्ण गावाला पोलिसांकडून प्रमाणपत्र भेटले आहे. हे पहिलेच मोठे प्रकरण आहे. यामुळे गावाला राजकारणाचा काय अनूभव असणार आहे.
धनंजय देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आमच्यासोबत जी लोकं आहेत, त्यांना या राजकारणाचा अनुभव आहे. म्हणून विचारपूर्वक हे वक्तव्य केले असणार, असे त्यांनी लोकप्रतिनिधींकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना म्हटले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत जबाबदारी घेत आम्हाला न्याय द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
नामदेव शास्त्रींची भेट घेत धनंजय देशमुखांनी सांगितले की, देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्यांच्या हत्येनंतर दिसले असते. माझा भाऊ दलित बांधवाला वाचवण्यासाठी गेला होता. आमची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे. ज्याला आरोपींची बाजू घ्यायची त्यालाच जातीयवादाचा अंश येत आहे. आम्ही सर्व दाखवले आहे. यांच्या कार्यालयात बसायचे. त्यांच्या गाडीत फिरायचे. संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहे. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक, सामाजिक कार्यकर्ते, आमच्यासोबत आहेत. न्यायाच्या भूमिकेत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधींना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचे ठरवू नका.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याला बीड पोलिसांनी वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे. सरपंच देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या 7 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कृष्णा आंधळे वगळता सर्वांना बेड्या ठोकण्यात आल्यात. पण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणी या सर्वांवर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाशी निगडीत असणाऱ्या खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
