Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

तुम्ही आमदार निवडून द्या ; मी परळी मतदारसंघाचं सोनं करीन- शरद पवार

ज्यांनी २०१९ च्या निवडणुकीत कृषीमंत्र्यांना निवडून दिलं त्यांनीच परळीतील नागरिकांची झोप उडवली - राजेसाहेब देशमुख

खा.शरद पवार यांच्या परळीतील सभेने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या विजयावर शिक्कामोर्तब..!

परळी ( प्रतिनिधी) - बीड जिल्ह्याचा आणि परळी विधानसभा मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणावर विकास बाकी आहे. जनतेच्या अनेक समस्या आमच्याकडे आलेल्या आहेत. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना बहुमताने निवडून द्या, मी या मतदारसंघाचं सोने करून दाखवीन. या भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ. त्याचबरोबर जनतेचा मूलभूत विकास करून दरडोई उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न आहे. एकही शेतकऱ्यांची समस्या उरणार नाही असा इथला आमदार काम करेल असा शब्द शरद पवारांनी परळीच्या भव्य विराट सभेस उपस्थित जनतेला दिला.


आपल्या विस्तारीत भाषणात खा.शरदचंद्र पवार म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी परळीला येणे झाले आहे. आताची परळी पुर्वीसारखी राहिली नाही, इथं गुंडगिरी वाढली आहे. इथले‌‌ प्रश्न अजूनही प्रलंबित असून सत्ताधाऱ्यांना ते सोडविण्यात अपयश आले आहे. पुढे बोलताना खा.पवार म्हणाले की, एक दिवशी माझ्या मुंबईतील घरी एकदा पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे आले होते. त्यांनी सांगितले की, आमच्यावर काही अडचणी आहेत. त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. मी म्हणालो कसली मदत ? ते म्हणाले, हा माझा मुलगा आहे. याच्याकडे लक्ष ठेवा. पंडितअण्णा यांच्या सांगण्यावरून आम्ही लोकांसाठी नेतृत्व दिले. मी त्यांना संधी दिली, पक्षात घेतलं. विरोधी पक्षनेता केलं. त्यांना आमदार केले, मंत्री केले. ऐकेकाळी बीड जिल्ह्याने माझे सर्व आमदार निवडून दिले होते. त्यामुळे तरूण पिढीचं नेतृत्व म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. दुर्दैवाने परिस्थिती बदलली. सत्ता आल्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे लागतात. त्यांच्या डोक्यात लवकर सत्ता गेली. आज तुमच्या भागात अनेक प्रश्न आहेत. त्याच्या मागे कोण आहे. ते लोक सांगतील, असंही खा.शरद पवारांनी यावेळी नमूद केलं. स्व.रघुनाथराव मुंडे आणि माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांनी आमच्या उमेदीच्या काळात पक्षाचे चांगले काम केले आहे. परंतु, स्वर्गीय रघुनाथराव मुंडे यांचा अकाली मृत्यू कशामुळे झाला ? याचं कोडं अद्याप उलगडलं नाही. म्हणून त्यांची आजही आठवण येत असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. परळी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी प्रतिपादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या झालेल्या जाहीर सभेने महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या विजयावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाला आहे. यावेळी व्यासपीठावर शरदचंद्र पवार यांच्यासह पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा खासदार फौजिया खान, काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, माकपचे नेते ऍड.अजय बुरांडे, राजेभाऊ फड, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, राजेश देशमुख, प्रभाकर वाघमोडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, आष्टी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेबूब शेख, ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, ज्येष्ठ नेत्या सुदामतीताई गुट्टे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल मुंडे, शहराध्यक्ष सय्यद हनीफ सय्यद करीम ऊर्फ बहादुर भाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष जीवनराव देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार रजनीताई पाटील, खासदार बजरंगबप्पा सोनवणे, वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख, माकपचे कॉम्रेड अजय बुरांडे, उत्तम माने आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते सुनील गुट्टे यांनी केले. तर सभेचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ऍड.माधव जाधव यांनी केले. या जाहीर सभेत प्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे माने तसेच पोखरी येथील सरपंच दौलतराव निकम यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेस परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू - भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक यांच्यासह प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.



खासदार रजनीताई पाटील :

या देशात हिंदू-मुस्लिम एकता राहावी. देशात जाती धर्मात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न काही जातीयवादी शक्तींकडून केल्या जात आहेत. देश एकसंध ठेवण्यासाठी महात्मा गांधी यांनी उपोषण केले होते. महात्मा गांधींनी देशासाठी बलिदान दिले. इंदिरा गांधी राजीव गांधी यांचा या देशासाठी खूप मोठा त्याग आहे. सर्व पुरोगामी पक्ष हे देश एकसंघ ठेवण्यासाठी आजही प्रयत्न करीत आहेत. यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. राजेसाहेब देशमुख यांनी काँग्रेस पक्षात गावोगावी जाऊन काम केले आहे. विद्यार्थी दशेपासून चळवळीमध्ये घडलेलं नेतृत्व आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू - भगिनींना जाहीर सभेदरम्यान केले.



भूषणसिंह राजे होळकर :

या भागातील अनेक  लोकांना पवार साहेबांनी आमदार केले. मंत्री केले, शून्यातून उंचीवर नेऊन ठेवलं. पण, सत्तेच्या पुढे व पैशाच्या पुढे परळी विधानसभा मतदारसंघाचा आमदार झुकला आणि पवार साहेबांना सोडून गेला. ज्यांनी घडवलं त्यांची किंमत नसेल तर तुमच्यासारख्या सामान्य जनतेची किंमत येथील आमदार काय करील. त्यामुळे तुम्ही सगळेजण सुजाण आहात. कुणाला मतदान करायचे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. शरदचंद्र पवार साहेब यांनी राजेसाहेब देशमुख यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला संधी दिली आहे. त्यांना भरघोस मतदान करा. कारण, महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना माहिती झाल आहे. आपलं सरकार येणार नाही. पराजय होणार आहे असे भूषणसिंह राजे यावेळी म्हणाले.


खासदार बजरंग सोनवणे :

पवार साहेबांनी या मतदारसंघाला आमदार, विरोधी पक्षनेतेपद, मंत्रीपद दिले. सर्व काही दिले. तरी साहेबांना धोका देण्याचे पाप केले. सरकार येत असतात आणि जात असतात. तुम्ही भयभीत होऊन काम करू नका. पालकमंत्री म्हणाले होते की, परळी मतदारसंघ भाजप मुक्त करू, बीड जिल्ह्यात सर्वांधिक राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन सोनवणे यांनी यावेळी केले.


राजेसाहेब देशमुख :

ही सभा समोरच्या उमेदवाराला धडकी भरवणारी सभा आहे. कारण, एवढे लोकं या ठिकाणी गोळा झालेत २०१९ च्या निवडणुकीत आपण ज्या उमेदवाराला निवडून दिलं त्या उमेदवारानं परळीकरांची झोप उडवली आहे. कुठल्याही सामान्य माणसाला जगणं मुश्किल झाला आहे २०२० ला बजाज आलायन्झ कंपनी कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्यात आणली २०२० ला बीड जिल्ह्यात १३ हजार ५०० रूपये प्रति हेक्टर प्रमाणे पिक विमा मंजूर झाला. पण, त्याचं वाटप अद्याप ७० टक्के लोकांना झालं नाही. आग्रीम रक्कम मिळाली नाही. अनुदान मिळालं नाही. कृषीमंत्री असून सुद्धा कुठले ही अनुदान देण्याचं काम या  निष्क्रिय कृषीमंत्र्यांने केलं नाही. ही परळी विधानसभा मतदारसंघातील जनता अतिशय परेशान झाली आहे. सर्वसामान्य माणसाचा श्वास गुदमरला आहे. या ठिकाणी मोकळा श्वास ते घेऊ शकत नाहीत. प्रत्येक माणूस परेशान झाला आहे. इथे व्यापाऱ्याला व्यापार करता येत नाही. त्यांच्या एजन्सी पुढील नेत्यांनी काढून घेतल्या आहेत. व्यापाऱ्याला नीट जगता येत नाही. सर्वसामान्य माणसाला जीव मुठीत घेऊन जीवन जगावं लागते. जरी गुन्हा केला नसेल तरी खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम परळीत होते. ते थांबलं पाहिजे, जर मला येथील जनतेने सेवा करण्याची संधी दिली. तर या भागात प्रत्येक घटकांतील नागरिकांना गुण्यागोविंदाने जगता आले पाहिजे, यासाठी आपण काम करणार असल्याचे ही परळी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यावेळी म्हणाले.


राजेश देशमुख :- 

परळी विधानसभा मतदार संघात राजेसाहेब देशमुख हे उमेदवार नसून स्वतः शरदचंद्र पवार साहेब हे उमेदवार आहेत असं समजून भावी काळात आपल्याला मतदान करायचे आहे. कसल्याही वल्गना केल्या आणि कोणी कुठला आहे असं म्हटलं तरी या परळीत मी सदैव या आपल्यासाठी झगडायला तयार आहे. मी परळीची सर्व जबाबदारी घेतो. कोणीही भुलथापाला बळी पडू नका. आपल्याला परळीत सुखाने व सन्मानाने नांदायचं आहे. या संधीचा फायदा आपण निश्चित घेतला पाहिजे. आमच्या ताटात कोणी माती कालवू नका आमचे आम्ही कमावतो आणि आमचं खातो ते आमच्या आम्हाला खाऊ द्या. परळीत शांतता पाहिजे, गुंडगिरी, दहशत संपली पाहिजे, व्यापाऱ्यांना व्यवस्थित व्यापार करता आला पाहिजे, त्यांचे संरक्षण झाले पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना सर्वांनी भरघोस मतदान करावे असे आवाहन वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी केले.


Saturday 9th of November 2024 08:32 PM

Advertisement

Advertisement