Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

केज येथे औद्योगिक वसाहत होण्याचा मार्ग मोकळा; पिसेगावला १६ हेक्टर जमीन आरक्षित

आ. नमिता मुंदडा यांची माहिती

केज - गेल्या अनेक वर्षांपासून केज येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न प्रलंबित होता. आता उद्योग वाढीसाठी पोषक असणाऱ्या औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. तर प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी पिसेगाव येथील १६ हेक्टर गायरान जमीन आरक्षित करण्यास प्रशासनाने अंतिम मान्यता दिली आहे. अशी माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली. 

       केज येथे उद्योगास चालना मिळण्यासाठी प्रस्तावित आद्योगिक क्षेत्रासाठी पिसेगाव येथील सर्वे. १०० मधील गायरान जमीन भूसंपादन करण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित जागेची माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावरून निवासी उपजिल्हाधिकार्यांनी पिसेगाव येथील २६.२४ हेक्टर व कुंबेफळ येथील सर्वे नं. १५७ मधील १७.७३ हेक्टर जमीन शिल्लक असल्याचे कळविताच औद्योगिक विकास महामंडळाच्या भुनिवड समितीने १६ जानेवारीला पाहणी केली. भुनिवड समितीच्या स्थळपाहणी अहवालानुसार हे क्षेत्र समतल व अतिक्रमण विरहित असून सदर क्षेत्राची संयुक्त मोजणी व कंटुर सर्वे अंती वाटप योग्य क्षेत्र असल्याचा अभिप्राय ही भुनिवड समितीने दिला आहे. त्यानुसार प्रस्ताव मंजुरीसाठी उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर चर्चा करून चर्चेअंती पिसेगाव येथील सर्वे नं. १०० मधील १६ हेक्टर गायरान जमिनीस महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ अधिनियम १९६१ चे कलम २ खंड (ग) च्या तरतुदी लागू करण्यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. 

        केजच्या एम आय डी सी ला मान्यता दिल्याबद्दल आ नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , उद्योगमंत्री उदय सामंत , लोकनेत्या मा पंकजाताई मुंडे , मा खा प्रितमताई मुंडे , एम आय डी सी चे सर्व अधिकारी व जागा देणाऱ्या पिसेगाव ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहेत 

     दरम्यान, औद्योगिक वसाहतीसाठी पिसेगाव येथील १६ हेक्टर जमीन प्रस्तावित केल्याने आता औद्योगिक वसाहत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर हा प्रश्न मार्गी लागल्याने उद्योग उभारणीची उद्योजकांना संधी उपलब्ध होणार असून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. 

कुंबेफळ येथेही होणार एम आय डी सी

पिसेगाव सोबतच कुंबेफळ येथीलही जागेची पहाणी करण्यात येऊन त्या ठिकाणची देखील जागेस मान्यता मिळाली होती परंतु त्याठिकाणी अस्तित्वात असलेले वीज उपकेंद्र व शाळेचे क्षेत्र वजा करणे राहिल्यामुळे त्यात दुरुस्ती करून प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे जाऊन मंजूर होईल व  काही दिवसात त्या ठिकाणीही एम आय डी सी मंजूर होईल अशी माहिती आ नमिता मुंदडा यांनी दिली आहे

Wednesday 4th of September 2024 04:39 AM

Advertisement

Advertisement