Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

नवरा अख्खा पगार देतो तरी बायको त्याचे ऐकत नाही

लाडकी बहीण योजना महायुतीसाठी फलदायी ठरणार की नाही हे येत्या विधानसभा निवडणुकीत समजणार असले तरी महायुती आणि मविआकडून या योजनेवर टीका- टोलेबाजी- प्रत्यूत्तरांची सरबत्ती सुरु आहे. यातच खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला टोला हाणला आहे. लाडकी बहीण योजना सुरुच राहणार असून महायुतीचे सरकार आणा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते सांगत आहेत. यावर नवऱ्याने सगळा पगार देऊनही बायको त्याचे ऐकत नाही, मग यांचे कोण ऐकणार असा टोला प्रणिती यांनी लगावला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आयोजित केलेल्या इंदिरा महोत्सवात त्या बोलत होत्या. राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली. विधानसभेसाठी जे सर्वे घेत आहेत त्याच्यामध्ये महायुतीला जागा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. महायुती सरकारच्या काळात महाराजांच्या पुतळ्यांमध्ये भ्रष्टाचार करण्यात येतो. आता कितीही योजना जरी आणल्या तरी सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीच्या बाजू‌ने ठामपणे उभी राहणार असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या.प्रवास करताना आम्हालाच खासदार असून सुरक्षित वाटत नाही तर सामान्य महिलांचे काय? असेही शिंदे म्हणाल्या. सोनिया गांधींनी आपल्याला आरक्षण दिले. मात्र ५० टक्क्यांसाठी आपणास भांडावे लागते. हे विकृत लोक ते मंजूरच करत नाहीत. पुढची निवडणूक जयश्री थोरात यांनी लढावी, असेही शिंदे यांनी सांगितले. सत्ताधारी आरोपींना पाठीशी घालत आहेत. काँग्रेसच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार कमी होते. परंतू आता सत्ताधारीच या लोकांना पाठीशी घालत असल्याने ते वाढले आहेत. हे लोक महिलांकडे वस्तू म्हणून बघत आहेत, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.


Tuesday 3rd of September 2024 05:22 PM

Advertisement

Advertisement