माजलगावात आंतरराज्य बाल मजूर तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड
बीड जिल्ह्यातील माजलगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील मुलांना या ठिकाणी आणून त्यांच्याकडून मेंढपाळाचे काम करून घेतले जात आहे. दिवसाला 18 तास काम करून घेतले जात असल्याची कबुली या मुलांनी पोलिसांसमोर दिली आहे. वर्षाकाठी या मुलांना या कामासाठी 25 हजार रुपये इतकी रक्कम ठरविण्यात आली होती.
आमच्याकडून दिवसाला 18 तास काम करून घेतलं जात असल्याचं या मुलांनी सांगितले तसेच काम न केल्यास लाकडाने तर कधी बुटाने मारहाण केली जायची. यासह जेवणही वेळेवर दिले जात नव्हते, असे सुटका झालेल्या मुलांनी पोलिसांना सांगितले आहे. हा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला.
मध्य प्रदेशातून या बालकांना कामासाठी बीडमध्ये आणने ही मानवी तस्करी आहे. ही तस्करी करण्यामध्ये खूप सारे एजंट आहेत. या मुलांचे शोषण देखील केले जाते. या प्रकरणातील सर्वांवर गुन्हा दाखल होऊन हे नेटवर्क समोर येणे गरजेचे आहे. या बालकांचे बालपण हिरावून घेणारे कोण? त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
