प्रकल्प मृत साठ्यात, २७ गावाच्या पाणी पुरवठा योजना अडचणीत
केज - पावसाळ्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीत मोठे पाऊस न झाल्याने केज तालुक्यात असलेल्या नऊ मध्यम, लघु प्रकल्पासह साठवण तलावात अपेक्षित पाणी साठा झाला नसून बहुतांश प्रकल्प व तलाव मृत साठ्यात आहेत. परिणामी, या प्रकल्पातून पाणी पुरवठा योजना सुरू असलेल्या २७ गावांच्या योजना अडचणीत आल्या असून भविष्यात टंचाईचे संकट ओढवू नये. म्हणून येणाऱ्या काळात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे.
गतवर्षी पावसाचा खंड आणि परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने मांजरा धरणासह मध्यम, लघु, साठवण तलावासह अपेक्षित पाणी साठा झाला नव्हता. त्यामुळे मे महिना अखेर मांजरा धरण हे मृतसाठ्यात गेले होते. तर लहान - मोठे तलाव मृतसाठ्यात आणि कोरडे ही पडले होते. परिणामी, पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू राहिल्या नव्हत्या. तर शेतीला पाणी न मिळाल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला होता. त्याचा फटका ऊस पिकासह रब्बी हंगामाच्या पिकांना बसला होता. त्यामुळे मांजरा धरणासह लहान - मोठ्या तलावात पाणी साठा होण्यासाठी चांगल्या पावसाची अपेक्षा केली जात होती.
यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली. पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग सुखावला. वेळेवर पेरण्या करता आल्या. नंतरच्या काळात पाऊस ही पडत राहिल्याने पिके चांगल्या प्रकारे वाढली आहेत. मात्र गतवर्षीच्या अल्प पावसाने पाणी पातळी खोलवर गेल्याने यंदा पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले असून लहान - मोठ्या तलावापर्यंत पाणी वाहून न गेल्याने दोन महिन्यांच्या पावसाळ्याच्या कालावधीत तालुक्यातील मध्यम - लघु प्रकल्प मृत साठ्यातून बाहेर आले नाहीत. भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटण्यासाठी येणाऱ्या काळात मोठे पाऊस पडण्याची गरज असून परतीचा पाऊस पडणे हे तितकेच महत्वाचे आहे.
२७ गावांच्या पाणी पुरवठा योजना अडचणीत
केज तालुक्यातील वाघेबाभुळगाव सिंचन तलावावरून वाघेबाभुळगाव, बानेगाव, नांदूरघाट, चाकरवाडी, खर्डेवाडी, धावजेवाडी या सहा गावांना पाणी पुरवठा केला जातो. जाधवजवळा तलावावरून जाधवजवळा, कोरेगाव, डोणगाव, शिरपुरा या चार गावांना पाणी पुरवठा केला जात असून उंदरीच्या तलावावरून आनंदगाव, सारणी, भाटूंबा, जवळबन या चार गावांना पाणी पुरवठा होत आहे. कारंजा तलावावरून आडस, उंदरी, चिंचपूर या तीन गावांना पाणी पुरवठा होत असून जानेगाव तलावावरून बनकरंजा, जानेगाव या दोन गावांना पाणी पुरवठा होत आहे. होळ तलावावरून होळ, लाडेवडगाव या दोन गावांना पाणी पुरवठा केला जातो. मुलेगाव तलावावरून मुलेगाव, मस्साजोग तलावावरून मस्साजोग, शिंदी या गावांना तर नाव्होली तलावावरून नाव्होली, माळेवाडी या दोन गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या जीवाचीवाडी व लिंबाचीवाडी क्र. १ हे दोन तलाव मृत साठ्याच्या वर असून उर्वरित ७ प्रकल्प मृत साठ्याच्या खाली आहेत. त्यामुळे या २७ गावांच्या पाणी पुरवठा योजना सध्या तरी अडचणीत आल्या आहेत.
सध्याचा तलावातील पाणी साठा
तालुक्यातील खालील तलावात असलेला पाणी साठा पुढील प्रमाणे व कंसात साठवण क्षमता
वाघे बाभूळगाव - १.०० दलघमी (४.८५३) मस्साजोग - ०.००८ दलघमी (२.२१६), कारंजा - ०.०१० दलघमी (२.२१६), होळ - ०.००४ (१.७१०), मुलेगाव - ०.००९(१.४३८), जानेगाव - ०.००२ (१.६८६), कासारी - ०.०१० (०.८७२), नाव्होली - ०.१०१ (१.०८२), जाधवजवळा - ०.४५० (४.७९०), उंदरी बरस - ०.२६० (५.२८९), जिवाचीवाडी - ०.१४० (१.५९४), लिंबाचीवाडी क्र. १ - ०.३६६ (१.४१४), लिंबाचीवाडी क्र. २ - ०.११० (१.४०१) अशी माहिती लघु सिंचन शाखा कार्यालयाचे कारकून संजय वाघमारे यांनी दिली.
