Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या राजेसाहेब देशमुख यांच्यासह मराठा आंदोलकांवर परळी पोलिसांकडून गुन्हा दाखल

जरांगेंच्या पोस्ट का करतोस म्हणून मारहाण ; परळीतील रास्ता रोको आंदोलन प्रकरण

परळी (प्रतिनिधी)  - परळी शहरात रविवार, दिनांक २८ जुलै रोजी अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यामुळे परळी पोलिसांकडून वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. हे आंदोलन विनापरवाना असल्याचे सांगत आंदोलकांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी राजेभाऊ श्रीरंग फड (रा.कन्हेरवाडी), राजेसाहेब देशमुख (रा.अंबाजोगाई), देवराव लुगडे महाराज (रा.जलालपूर,परळी), ऍड.माधव जाधव (रा.घाटनांदूर), वैजीनाथ माने (रा.परळी) यांच्यासह २० ते २५ अनोळखींचा आरोपीत समावेश आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संघर्षयोध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी परळी ते तुळजापूर निघालेल्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी अजय देशमुख हे त्यांच्या मोटरसायकलवरून शहरातील आझाद चौकातून वैद्यनाथ कॉलेज मार्गे निघाले होते. यावेळी त्यांची मोटरसायकल रस्त्यात अडवून ज्ञानेश्वर मुंडे व इतर अनोळखी पाच जणांनी जरांगेंच्या पोस्ट का करतोस..? म्हणून बेल्ट व काठीने देशमुख यांना मारहाण केली. ही घटना समजल्यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत पायी दिंडीतील सर्व कार्यकर्त्यांसह बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, देवराव लुगडे महाराज, ऍड.माधव जाधव, वैजीनाथ माने हेही रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. परळी - अंबाजोगाई रस्त्यावर ठाण मांडून आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले. मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नसल्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होता. अजय देशमुख यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक झालीच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा ही यावेळी देण्यात आल्या होत्या. या दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ऍड.माधव जाधव, राजेभाऊ फड, देवराव लुगडे महाराज, वैजीनाथ माने यांनी आंदोलकांची भेट घेतली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन २४ तासांच्या आत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले व पायी दिंडी अंबाजोगाईकडे मार्गस्थ झाली. या प्रकरणी अजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद ही झाला आहे. असे असताना २८ जुलै रोजी न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या राजेसाहेब देशमुख यांच्यासह मराठा आंदोलकांसह इतरांवर पोलिस अंमलदार विष्णु उध्दवराव फड यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात २८ जुलै रोजी गु.रनं- ११७/२०२४ कलम १२६ (२), २२३ भारतीय न्याय संहीता २०२३ अन्वये सदरील नमूद करण्यात आलेल्या तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीतांनी सार्वजनिक रस्ता अडवून रस्त्यावर बसून सार्वजनिक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा करून व पोलिस अंमलदार यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार गीते हे करीत आहेत.

न्याय मागणारांवरच गुन्हे दाखल का..?

परळी येथे संघर्षयोध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट का करतो..? असे म्हणत अजय देशमुख यांना रविवारी मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आमच्यावर अन्याय झाला. सनदशीर व लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागत होतो. असे असताना ही केवळ राजकीय दबावामुळे पोलिसांकडून मारहाण प्रकरणातील गुन्हेगारांना सोडून उलट आमच्या सारख्या आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. यावरून राज्यातील महायुतीचे सरकार हे मराठा समाजाचा सातत्यपूर्ण द्वेष करीत आहे. हे पुन्हा एकदा दिसून आले. महायुतीचे हे सरकार जरी मराठा समाजासोबत अन्यायाने वागत असले तरी आमचा भारतीय कायदा आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता योग्य न्याय करेल.

- राजेसाहेब देशमुख

(जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बीड.)

Wednesday 31st of July 2024 05:19 PM

Advertisement

Advertisement