महाराष्ट्र शिक्षण संस्थेची नूतन वसतिगृह इमारत, सौर विद्युत संचाचे लोकार्पण
अद्यावत संगणक प्रयोगशाळा व स्वावलंबी संजीवक शेती प्रयोग राबविणार - डॉ. विवेक सावंत
पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास नको - डॉ. विवेक मॉंटेरो
परळी - ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगराळ भागात मोहा येथे अद्यावत संगणक प्रयोगशाळा व स्वावलंबी संजीवक शेती यासारखे नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून या भागातील जीवनमान उचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी गाव्ही महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य संवर्धक डॉ. विवेक सावंत यांनी दिली तर पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारा विकास हा दीर्घकाळ विपरीत परिणाम करणारा असणार आहे असे मत शास्त्रज्ञ डॉ. विवेक मॉंटेरो यांनी व्यक्त केले.
परळी तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठी शाळा असलेल्या महाराष्ट्र विद्यालय संकुलात उभारण्यात आलेल्या नूतन वसतीगृह इमारत, सौर विद्युत संच लोकार्पण व पालक मेळावा मंगळवार दि 30 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटन म्हणून डॉ. विवेक सावंत, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विवेक मॉंटेरो, अध्यक्षस्थानी सिटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी. एल.कराड, एम.के.सी.एल चे समीर पांडे, विनायक कदम, वरिष्ठ व्यवस्थापक नितीन दातार, उप व्यवस्थापक निलेश नालात, अभियंता राहुल बोरा, सचिन राडकर आदीसह महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.सावंत म्हणाले की, बीड जिल्ह्यातील ऊसतोड देशाला स्वातंत्र्य मिळुन देखील ऊसतोड कामगारांना शुद्ध पिण्याचे पाणी अथवा वीज मिळत नाही. ऊसतोड कामगार हे अत्यंत हालाकीचे जीवन जगतात हे प्रत्यक्ष पाहिले आहे.ऊसतोड कामगारांचे हे हाल दूर करण्यासाठी एम.के.सी.एल व भाभा रिसर्च केंद्र यांच्या प्रयत्नांतून नॅनो तंत्रज्ञान वापर करत पाणी शुद्धीकरण यंत्र व सौर ऊर्जा संच निर्माण करण्याचे प्रयत्न केले.बीड जिल्ह्यातील मोहा या अति दुर्गम भागात अद्यावत संगणक प्रयोगशाळा व स्वावलंबी संजीवक शेती यासह विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन या भागातील विद्यार्थी व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशी गाव्ही दिली.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले भाभा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.मॉंटीरोओ यांनी सांगितले की, संविधानानुसार केवळ मोफत व सक्तीचे शिक्षण नाही तर दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे.विद्यार्थ्यांना भीतीदायक असलेल्या विषय दर्जेदार पध्दतीने कसा शिकवता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.शिक्षणाने व्यक्तीचा, परिवाराचा, समाजाचा व पर्यायी देशाचा विकास होतो मात्र आज दिसत असलेला भौतिक विकास हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असून याचे दीर्घकालीन विपरीत परिणाम भोगावे लागणार आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना डॉ.कराड म्हणाले की, महाराष्ट्र शिक्षण संस्थेमुळे शिक्षण घेता आले.शिक्षणाची खरी गोदावरी ग्रामीण भागात आणायचे काम संस्थापक कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांनी केले. गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देत सातत्याने काय नवीन करता येईल याचा सातत्याने प्रयत्न संस्थेकडून करण्यात येत असतात. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे यांनी शाळेतील भौतिक सुविधा सोबतच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची उपस्थित पालकांना माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक गणेश कुरे तर आभार व्यक्त मुख्याध्यापक मुरलीधर बोराडे यांनी केले.