Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

केज विधानसभेची आगामी निवडणूक लढवणारच!

माजी आ. संगीता ठोंबरे यांचा निर्धार

केज- केज मतदारसंघातील जनतेनं माझ्यावर विश्वास टाकीत त्यांची सेवा करण्याची संधी मला दिली आहे. केज मतदारसंघाच्या विकासासाठी मी  निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून यंदाच्या निवडणुकीत मी पुर्ण ताकदीने निवडणूकीला सामोरे जाणार आहे, अशी स्पष्ट भूमिका केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना विषद केली.


केज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत आज माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला भाजपाचे दिलीप काळे, विजयप्रकाश ठोंबरे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, ‘भिमशक्ती’ चे भिमराव सरवदे‌ यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.


पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार संगिता ठोंबरे म्हणाल्या की, केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत एक व्हिजन‌ डोळ्यासमोर ‌ठेवून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. केज विधानसभा मतदारसंघात अजूनही विकासाची‌‌ बरीच कामं प्रलंबित आहेत. त्यासोबतचं केज मतदारसंघातील जिव्हाळ्याचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. निवडणूक लढताना मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे माजी आमदार ठोंबरे यांनी सांगितले.


केज मतदारसंघातील धनेगाव येथील प्रकल्पात मराठवाड्याचं‌‌ हक्काचं 3 टीएमसी पाणी आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘एमआयडीसी’ ची निर्मिती अंबाजोगाई आणि केज या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. त्याही प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 


विविध प्रश्नांवर भूमिका केली स्पष्ट 

केज विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारले तर आपण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार ? असं पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आज तरी पर्याय नसल्याचे सांगत येणाऱ्या काळात जो चांगला पर्याय असेल त्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, संगिता ठोंबरे यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर  मनमोकळ्या‌पणाने चर्चा करून विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली.‌ या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

Tuesday 30th of July 2024 09:29 PM

Advertisement

Advertisement