Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मांजरा धरण मृत साठ्यातून बाहेर, एक टक्के जिवंत पाणी साठा

दोन महिन्यात केवळ ८ दलघमी पाणी वाढले

केज  - लातूर, बीड, धाराशिव या तीन जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरण क्षेत्रात पावसाळ्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत केवळ ८ दलघमी इतका पाणी साठा वाढला आहे. तर धरण हे मृतसाठ्यातून बाहेर आले असून धरणात १.०३ टक्के जिवंत पाणी साठा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चांगले पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


     केज तालुक्यातील धनेगाव येथील २२४.०९३ दलघमी साठवण क्षमतेच्या मांजरा धरणातून लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या पाच शहरासह येडेश्वरी साखर कारखाना, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यासह केज, कळंब, लातूर तालुक्यातील ६३ गावांना पाणी पुरवठा केला जातो. या सर्व पाणी पुरवठा योजनांना वर्षभर २५ दलघमी इतके पाणी पुरविले जाते. तर ६१ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ मिळत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मांजरा धरणात गतवर्षी अल्प पाऊसकाळ झाल्याने अपेक्षित पाणी साठा झाला नव्हता. तर धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचा विचार करून गतवर्षी ऑगस्ट महिन्यापासून धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते. त्यानंतर २४ मे पर्यंत जिवंत साठ्यातील पाणी पिण्यासाठी पुरविण्यात आले होते. २५ मे रोजी धरण हे मृत साठ्यात गेल्याने मृत साठ्यात ४७.१३० दलघमी इतके पाणी शिल्लक राहिले होते. 


      यंदा पावसाने सुरवात चांगली केल्याने पेरण्या वेळेवर झाल्या. पुढे ही पाऊस पडत आहे. मात्र गतवर्षी तालुक्यातील लहान - मोठे तलावांनी तळ गाठला होता. हे तलाव भरल्यानंतर नद्या भरून वाहतात. या नद्यांचे पाणी मांजरा नदीतून धरणात जाते. त्यानंतर धरणात पाण्याची आवक होते. आणखी मांजरा नदी वाहत नसल्याने धरणात पाण्याची आवक झालेली नाही. मात्र धरण क्षेत्रात दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या ५१४ मिलिमीटर पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात ८.११ दलघमी इतकी वाढ झाली असून धरण हे मृत साठ्यातून बाहेर आले आहे. धरणात आता १.०३ टक्के जिवंत पाणी साठा झाला आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या दृष्टीने येणाऱ्या काळात मोठे पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून परतीच्या पावसावर धरण ओव्हरफ्लो होत असल्याने परतीच्या पावसाकडे लक्ष लागणार आहे. 

धरणात सध्या १.८२१ दलघमी इतका जिवंत पाणी साठा असून धरणातील उपलब्ध ४८.९५१ दलघमी इतके पाणी सहा महिने पुरते. मात्र भविष्यातील पिण्याचे पाणी व सिंचनाच्या दृष्टीने धरणात अपेक्षित पाणी साठा होणे महत्वाचे आहे. 


सूरज निकम 

शाखाधिकारी, मांजरा धरण, धनेगाव. 


Monday 29th of July 2024 09:40 PM

Advertisement

Advertisement