व्यापाऱ्यास मारहाण करून सोन्याची चैन, अंगठी हिसकावून घेतली
केज पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
केज : केज - अंबाजोगाई रस्त्यावरील पिसेगाव फाटा येथे एका व्यापाऱ्यास पाच जणांनी लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करीत सोन्याची चैन, अंगठी असा ७५ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली आहे.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांचे लहाने बंधू व्यापारी ज्ञानेश्वर शिवाजी सुर्यवंशी (वय ३८) यांचे केज शहरात मुख्य रस्त्यावर श्री व्यंकटेश एजन्सी कृषी मशिनरीचे दुकान आहे. २५ जुलै रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. ते केज - अंबाजोगाई रस्त्यावर पिसेगाव फाटा येथे वळत असताना पिसेगाव फाट्यावर लावलेल्या बॅनरचे पाठीमागे पाच अनोळखी इसम तोंडाला काळ्या रंगाच्या मफलर बांधून उभे होते. त्यातील एका इसमाने पाठीमागून लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. दुसऱ्या इसमाने त्याच्या हातातील लाकुड त्यांच्या दुचाकीच्या पुढच्या चाकात घातले. त्यामुळे ते दुचाकीवरून खाली पडले. त्या पाच जणांमध्ये त्यांच्या भावकीतील ओळखीचा रवी दत्तात्रय सुर्यवंशी हा दिसल्याने ते त्यास मी तुला ओळखतो असे म्हणताच रवी सूर्यवंशी याने हातातील कोयत्याने त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. तुला आता जिवच मारून टाकतो असे म्हणत त्यांच्या पाठीवरील बॅग हिसकावून घेत असताना दुसऱ्या अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी व १५ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅमची अंगठी हिसकावून घेतली. त्यांनी आरडाओरडा करताच ते सर्व जण पळून गेले. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मदतीला धावून आलेल्या भास्कर त्रिंबक नेहरकर, संजय व्यंकट सुर्यवंशी, राहुल कुंडलीक चाटे यांनी त्यांना उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविले. सूर्यवंशी यांच्या डोक्याला गंभीर मार असून सात ते आठ टाके घेण्यात आले आहेत तसेच पायांनाही मार लागला आहे .दरम्यान २७ जुलै रोजी व्यापारी ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रवी सुर्यवंशीसह अनोळखी चार इसमाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एकूणच घडलेल्या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे
