वातावरण अनुकूल बदलासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक - अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे
एडीएम ऍग्रो आणि व्यंकटरमणा ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड
परळी -एडीएम ऍग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लि, लातूर आणि व्यंकटरमणा ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने, मौजे आनंदवाडी, तालुका परळी (जि.बीड) या ठिकाणी देशी प्रजातीच्या १०० वृक्षांच्या लागवडीचा कार्यक्रम रविवार, दिनांक ०७ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटरमणा ऍग्रोचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथराव कातकडे हे होते तर डॉ.बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, लातूर यांच्या शुभहस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एडीएम ऍग्रोचे व्यवस्थापक अमोल ढवण, गोपाळ तळेकर आणि राम शिनगारे हे उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, एक वृक्ष प्रतिदिन चार किलो ऑक्सिजनची निर्मिती करतो तर एका मनुष्यास दिवसाकाठी सोळा किलो ऑक्सिजनची गरज असते हे लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने किमान चार वृक्षांची लागवड करणे व त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. एकूण भूभागाच्या ३३ टक्के क्षेत्र हे वनाच्छादित असणे आवश्यक असताना मराठवाडा परिसरात हे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. यामुळेच वातावरणातील बदल मोठ्या प्रमाणात घडत असून याचा प्रतिकूल परिणाम शेतीवरती होत आहे पुढे डॉ.ठोंबरे यांनी असे प्रतिपादन केले कि वातावरण अनुकूल बदलासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक आहे. तसेच यावेळी बोलताना अमोल ढवण यांनी वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती दिली नुकतेच पाकिस्तान मध्ये सातशे पेक्षा अधिक नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची नोंद आहे. यासोबतच वृक्षांचा जिथे अधिवास आहे अशा ठिकाणी दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने तापमान कमी असल्याच्या नोंदी हवामान खात्याकडून नोंदविण्यात आल्या आहेत.
गोपाळ तळेकर यांनी एडीएम ऍग्रोकडून निसर्ग संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. मागील वर्षी एडीएम ऍग्रोकडून शाश्वत शेती उपक्रमातील लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर १४,००० वृक्षांची लागवड करून त्यांचे जिओ टॅगिंग करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना व्यंकटरमणा ऍग्रोचे संचालक सूर्यकांत कातकडे यांनी केली तर सचिन कातकडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमामध्ये शेतकरी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एडीएम ऍग्रोच्या शेतकरी उत्पादक कंपनी विभागाचे जिल्हा समन्वयक विजय गुळभिले यांनी तसेच व्यंकटरमणा ऍग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
