ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव; योग्य कीटकनाशक वापरून करा व्यवस्थापन
सोयाबीन पिकाचे करा एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन : शिवप्रसाद येळकर
सद्यस्थितीत मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर हिरव्या अमेरिकन बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनची पाने कुरतडून खाल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकरी सदर अळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस नसलेली कीटकनाशके वापरत आहेत त्यामुळे अळीचे व्यवस्थापन होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे दुबार फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन उत्पादन खर्च वाढत आहे. सोयाबीन पिकामधील सद्यस्थितीत निदर्शनास येत असलेल्या हिरव्या अमेरिकन बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३% अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ४.६% झेडसी पूर्वमिश्रित कीटकनाशक ८० मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५ एससी ६० मिली किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८% एससी १०० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट १.९% ईसी १०० मिली किंवा आयसोसायक्लोसिरम ९.२% डीसी १२० मिली किंवा फ़्ल्युबेन्डामाईड २०% डब्ल्युजी १०० ग्रॅम किंवा फ़्ल्युबेन्डामाईड ३९.३५% एससी ६० मिली किंवा इन्डोक्झाकार्ब १५.८% ईसी १२० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५०% ईसी ४०० मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर क्षेत्रासाठी फवारणी करावी. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे अन्नद्रव्य निर्मितीस अडथळा आल्यामुळे तसेच हलक्या जमिनीवर आणि चुनखडी युक्त पांढऱ्या जमिनीवर सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता म्हणजेच क्लोरोसिस (हरितरोग) ही विकृती असून याच्या व्यवस्थापनासाठी १९:१९:१९ हे फॉलियर ग्रेड विद्राव्य खत ५ ग्रॅम अधिक महाराष्ट्र ग्रेड दोन द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्याची २ मिली प्रति १ लिटर पाणी किंवा पावडर स्वरूपातील महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्याची २ ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी. वेगवेगळ्या कीडनाशकांची मिश्रणे करू नये, कीटकनाशकासोबत विद्रव्य खते, संप्रेरके इत्यादी मिसळू नये. फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ५-७ असावा. कीटकनाशकाच्या डब्यावरील सूचना वाचून त्याचे पालन करावे व फवारणी करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा असा सल्ला ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी दिला आहे.
Wednesday 10th of July 2024 04:40 PM
