भाजीपाला परसबाग प्रत्येक कुटुंबासाठी महत्वाची : डॉ. उपेंद्र कुलकर्णी
अंबाजोगाई - दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे महिला शेतकऱ्यांसाठी ‘पोषणमूल्य आधारित परसबाग’ प्रशिक्षण प्रात्यक्षिक व आरोग्य शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर डॉ. उपेंद्र कुलकर्णी (प्रकल्प संचालक, दीनदयाल शोध संस्थान बीड), डॉ. नितीन धर्मराव (सदस्य दीनदयाल शोध संस्थान), श्रीमती संध्या कुलकर्णी (संभाजीनगर), श्री. धनराज पवार (आरोग्य समुपदेशक अंबाजोगाई), डॉ. वसंत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), श्री. सुहास कुलकर्णी (जिल्हा कार्यक्रम अधिकारी), श्री. अनिल चव्हाण (टेलीमानस, लोखंडी सावरगाव) व रोहिणी भरड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. देशमुख यांनी सांगितले कि, भाजीपाल्याची नियमित लागवड घराच्या भोवती करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व शेतकरी परिवारांना ताज्या आणि पोषणमूल्यांनी समृद्ध भाज्या मिळतील यासाठी सदर कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. धर्मराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिला या कुटुंबाचा कणा असतात. त्यांचे आरोग्य नियमित सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थान कार्य करत आहे. महिलांनी कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घ्यावा
डॉ. कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले कि, प्रत्येक कुटुंबासाठी पोषणमूल्य आधारित परसबाग महत्वाची आहे. यामुळे कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी परसबाग भाजीपाल्याचे व्यवस्थापन नीट केले तर त्यांना वर्षभर चांगल्या दर्जाच्या भाज्या मिळू शकतात. त्यातून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक बचत होईल.
शेतकरी महिलांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल खूप उत्साह दाखवला आणि त्यांनी सांगितले की, प्रशिक्षणामुळे त्यांच्या कुटुंबासाठी पोषण आहार बाग तयार करण्याची प्रेरणा मिळाली. कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते आणि त्यांचा विकास होतो. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक व आरोग्यविषयक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या कार्यक्रमात अंबाजोगाई, केज, वडवणी आणि धारूर तालुक्यातून १४८ महिला शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. प्रशिक्षणार्थींना १६ प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांचे वाटप केले व लागवड साहित्य देण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला शेतकऱ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येवून त्याना औषध-उपचार देण्यात आला. आरोग्य तपासणीसाठी शासनाच्या महालॅब यंत्रणेचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विद्या शास्त्रज्ञ कृष्ण कर्डिले तर आभार डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.