Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

"माझी लाडकी बहीण" या योजनेचा लाभ सर्व पात्र माता भगिनींनी घ्यावा-राजकिशोर मोदी

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या "मुख्यमंत्री -लाडकी बहीण" योजनेचा फायदा राज्यातील सर्व पात्र माता भगिनींनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे. या योजने अंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले असल्याचे मोदी यांनी सांगत त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

          राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहिर केलेल्या 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण' ही योजना नुकतीच जाहीर केली. अतिशय अल्पावधीतच या  योजनेची लोकप्रियता वाढल्याने सदर योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करत काही अटी शिथील करून अर्ज सादर करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहर व परिसरातील पात्र माता भगिनींनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घेवून गरजू व पात्र महिलांना याकामी मदत करावी असे आवाहनही राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

          महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहिर करताना उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण' ही अतिशय लोकप्रिय योजना जाहिर केली आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दि.१जुलै२०२४ पासून दरमाह १५०० रुपये आर्थिक लाभ शासनाच्या वतीने मिळणार आहे.  त्यामुळे या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत  पंधरा दिवसांहून दोन महिन्यापर्यंत वाढविल्यामुळे लाभार्थी महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्याचबरोबर या योजनेतील अनेक निकषांमध्ये सुधारणा करून आणि काही अटी शिथील करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच केली आहे. या योजनेचा अधिकाधिक महिलांना सहज सुलभपणे लाभ घेता यावा यासाठी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सुध्दा राजकिशोर मोदी यांनी केले आहे.     

          योजनेला मुदतवाढ देताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बदल केला आहे. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. योजनेतून शेतकरी बांधवांसाठी पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. योजनेत लाभार्थी महिलेचा वयोगट २१ ते ६५ वर्षे असा करण्यात  आला आहे. त्याचबरोबर अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल  आणि ज्या कुटूंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. त्यासोबतच योजनेत कुटूंबातील एका पात्र अविवाहीत महिलेला सुध्दा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार दुर्बल घटकातील अधिकाधिक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेवून महायुती शासनाने दिलेल्या १५०० रुपये मासिक अर्थसहाय्याचा फायदा घेण्याचे आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

Monday 8th of July 2024 09:24 PM

Advertisement

Advertisement