ढाकणवाडी येथे तिघांना काठी, कोयत्याने मारहाण
केज - दुचाकीचा धक्का देऊन उलट तिघांना काठीने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना ढाकणवाडी (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी दोन महिलांसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ढाकणवाडी येथील संपत त्रिंबक ढाकणे हे ७ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजता घरासमोर उभे असताना गवताचा भारा घेऊन जाणाऱ्या कृष्णा तुकाराम ढाकणे, लता तुकाराम ढाकणे यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्यांनी दुचाकी लांबून घेऊन जायची असे म्हणाले. त्यावरून या दोघांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्याने व कोयत्याने मारहाण केली. कोयते त्यांच्या हाताच्या बोटावर लागल्याने जखमी झाले. तेवढ्यात कृष्णा याची पत्नी निकिता ढाकणे हिने येऊन काठी त्यांच्या कपाळावर मारली. तर त्यांची पत्नी सोनाली व मुलगा प्रतीक हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांना ही मारहाण केल्याने कोयते प्रतीक याच्या हाताच्या दंडावर लागल्याने तो जखमी झाला. या मारहाणीत त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठण खाली पडले. त्यानंतर छेडछाडीची केस करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. अशी तक्रार संपत ढाकणे यांनी दिल्यावरून कृष्णा ढाकणे, लता ढाकणे, निकिता ढाकणे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार उमेश आघाव तपास करताहेत.
