अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात समाधानकारक पाऊस
धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात सोमवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतात पाणीच पाणी जमा झाले होते. सर्व शेती जलमय झाली होती. परिसरातील मांजरा नदी आणि नाले खळखळून वाहिले. सकाळी तटबोरगाव येथील ओढ्याला पाणी आल्याने धानोरा तट-बोरगाव वाहतूक बंद होती.
धानोरा खुर्द परिसरातील आपेगाव, तटबोरगाव, कोपरा, अंजनपूर, सोमनाथ, बोरगाव, देवळा, पाटोदा, ममदापूर, अकोला, तडोळा आधी गावांत संध्याकाळी आठ वाजता पाऊस सुरू झाला होता. संध्याकाळी अकरा वाजता मोठ्या पावसाला सुरुवात झाली.
गेल्या चार-पाच दिवसांत परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. रात्रभर पाऊस असल्याने शेतात पाणीच पाणी झाले होते. छोटे ओढे-नाले, मांजरा नदी सकाळी खळखळून वाहत होती. या मोठ्या पावसाने शेतकरी समाधानी झाले आहेत. आपेगाव-इस्थळ आणि धानोरा तटबोरगाव रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्याने काही वेळ वाहतूक बंद होती. परिसरात मोठा पाऊस झाल्याने मांजरा नदी खळखळून वाहत असल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी केलेली आहे.