Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

स्वाराती रुग्णालयातील कालबाह्य झालेली सीटी स्कॅन मशीन तात्पुरत्या अवस्थेत पुन्हा सुरु

आ. नमिता मुंदडांचे प्रयत्न यशस्वी; नवीन मशीनसाठी प्रयत्न सुरु

अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन मागील सात महिन्यापासून बंद पडली होती. आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर अनेक अडचणींवर मात करत हि मशीन तात्पुरत्या अवस्थेत पुन्हा सुरु करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे अति अत्यावस्थ रुग्णांची गैरसोय टळणार आहे. दरम्यान, कालबाह्य झालेली सध्याची मशीन कितपत चालेल याबाबत शंका असल्याने आ. नमिता मुंदडा यांनी नवीन सीटी स्कॅन मशीनसाठी युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु केला आहे. 

अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचा अंबाजोगाई, बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मोठा आधार आहे. रुग्णांच्या सोयीसाठी अत्यल्प दरात अद्यावत यंत्रसामुग्रीद्वारे तपासणी करून उपचार होत असल्याने येथे रुग्णांची दररोज प्रचंड गर्दी असते. मात्र, मागील सात महिन्यापासून येथील सीटी स्कॅन मशीन बंद पडल्याने रुग्णांची गैरसोय होऊ लागली होत. सर्व सामान्यपणे सीटी स्कॅन मशीनचे आयुष्य १० वर्षांचे असते, मात्र स्वाराती रुग्णालयातील मशीनला १२ वर्षे झालेली आहेत. त्यामुळे केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नवीन मशीनसाठी पाठपुरावा सुरु केला. परंतु, हि प्रक्रिया वेल्काहू असल्याने तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात जुनी मशीन देखील सुरु करावी यासाठी आ. मुंदडा यांनी प्रयत्न सुरु केले. परंतु बिले थकल्याने फिलिप्स कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आ. मुंदडा यांनी पुढाकार घेत अधिष्ठाता आणि फिलिप्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतःच्या निवासस्थानी बैठक घेतली. त्यानुसार, फिलिप्स कंपनीचे गतवर्षीचे थकीत ४७ लाख रुपयांचे यावर्षी डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले. तसेच चालू वर्षाचे संपूर्ण ४४ लाख रुपयांचे बिल देण्याऐवजी ११ लाख रुपये लेबर चार्जमध्ये मशीन दुरुस्त करून देण्यासाठी आ. मुंदडा यांनी फिलिप्स कंपनीला तयार केले. दरम्यान, रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी इतर रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी संपर्क साधून त्यांच्याकडील कालबाह्य झालेल्या मशीनचे चालू असलेले सेकंद हॅण्ड पार्ट देण्यासाठी विनंती केली. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर मशीनचे जुने पार्ट उपलब्ध झाले. त्यानंतर फिलिप्स कंपनीच्या तंत्रज्ञांनी स्वाराती मधील मशीनला हे पार्ट जोडून मशीन सुरु करून दिली. त्यामुळे सद्यस्थितीत तरी अति आवश्यक रुग्णांसाठी या मशीनचा वापर करणे शक्य होणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 

नवीन मशीनसाठी प्रयत्नशील

‘स्वाराती’मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता सध्याची मशीन कालबाह्य झाल्याने राज्य शासनाकडे नवीन मशीनची मागणी केली आहे. त्यासाठी सर्व स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरु असून त्यास लवकरच यश मिळेल. तोपर्यंत तात्पुरत्या अवस्थेत जुनी मशीन सुरु करून घेतली आहे. केवळ अतिगंभीर रुग्णांसाठी मशीनचा उपयोग करणे शक्य आहे.

- आ. नमिता मुंदडा, केज विधानसभा मतदार संघ

-----------

मशीन सुरु झाली, काळजी घेणे आवश्यक

कालमर्यादा संपूनही रुग्णांची गरज लक्षात घेता सध्याची मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. जुनी असल्याने मशीन लवकर गरम होत आहे. मशीनचा सतत वापर करणे शक्य नसून अधूनमधून खंड देणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ अति अत्यावस्थ रुग्णांसाठीच मशीनचा वापर करण्यात येणार आहे. अडचण लक्षात घेता रुग्ण आणि नातेवाईकांनी सहकार्य करावे.

- डॉ. शंकर धपाटे, अधिष्ठाता

Monday 10th of June 2024 09:16 PM

Advertisement

Advertisement